दिल्लीत ‘शिवकालीन शस्त्रसंग्रहालय’ उभारण्याचे सांस्कृतिक मंत्र्यांचे आश्वासन

विद्यार्थी आणि मान्यवरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नवी दिल्ली – देशाच्या राजधानीतील भारत मंडपम् येथे झालेल्या भव्य ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’तील ‘स्वराज्य का शौर्यनाद’ या प्रदर्शनीद्वारे राष्ट्रभक्ती, ईश्वरीकृपा आणि शौर्याची शक्ती यांचा अद्वितीय संगम साधला. भारत मंडपम प्रांगणातील हॉल क्र. १२ मध्ये १३ ते १५ डिसेंबर या कालावधीत या प्रदर्शनीमध्ये शिवकालीन शस्त्रप्रदर्शन, वंदे मातरम प्रदर्शन, आध्यात्मिक मूल्य असलेल्या वस्तूंचे प्रदर्शन, यांसह ग्रंथप्रदर्शनही लावण्यात आले होते.

` या प्रदर्शनात विद्यार्थी, पालक, हिंदुत्वनिष्ठ आणि विविध मान्यवरांना शिवकालीन शस्त्र केवळ पाहण्यासाठीच नव्हे, तर तेजस्वी राष्ट्रपुरुषांच्या काळातील शस्त्रे प्रत्यक्ष हाताळण्याची संधी देण्यात आली. या दैवी स्पर्शातून हिंदवी स्वराज्याच्या काळातील पराक्रम आणि शौर्य याची जिवंत अनुभूती उपस्थितांच्या मनात निर्माण झाली. या निमित्ताने दिल्लीचे सांस्कृतिक मंत्री श्री. कपिल मिश्रा यांनी दिल्लीत कायमस्वरुपी ‘शिवकालीन शस्त्रसंग्रहालय’ स्थापन करण्याचे आश्वासनही दिले.
या प्रदर्शनाला भारताचे माजी सरन्यायाधीश श्री. उदय लळीत, केंद्रीय सांस्कृतिक मंत्री श्री. गजेंद्रसिंह शेखावत, केंद्रीय उर्जा राज्यमंत्री श्री. श्रीपाद नाईक, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्री. संजय सेठ, राज्यसभा सदस्य, तसेच भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. सुधांशू त्रिवेदी, दिल्लीचे सांस्कृतिक मंत्री श्री. कपिल मिश्रा यांसह संत-महंत, प्रशासकीय अधिकारी, वरिष्ठ पत्रकार, संपादक, साहित्यिक, पोलीस अधिकारी, उद्योगपती, अधिवक्ते, लष्करी अधिकारी, हिंदू संघटनांचे प्रमुख अशा सहस्रो लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या वेळी दिल्लीतील शाळांमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने प्रदर्शन पाहिले. विद्यार्थ्यांनी शिवकालीन शस्त्रांची बनावट, त्यांतील बारकावे, त्यांचा उपयोग आणि त्यामागील विज्ञान प्रत्यक्ष जाणून घेतले. हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु चारुदत्त पिंगळे, धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ आणि सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी विद्यार्थ्यांशी आणि पालकांशी संवाद साधत, इतिहासातून राष्ट्रप्रेरणा घेऊन समाजकार्य व राष्ट्रकार्यात योगदान देण्याचे आवाहन केले.

शिक्षिका श्रीमती सारिका शर्मा म्हणाल्या, ‘विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शस्त्र हाताळत इतिहासाची अनुभूती घेतली. या अनुभवामुळे त्यांच्यात राष्ट्रगौरव आणि आत्मसन्मान जागृत झाला.’ विद्यार्थिनी कु. पूजा कौशिक म्हणाली, ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी लक्ष्मीबाई यांच्या कार्यातून मला राष्ट्रासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा मिळाली,’ तर कु. आराध्या (इयत्ता ७ वी) म्हणाली, ‘मी मोठी होऊन झाशीच्या राणी लक्ष्मीबाईप्रमाणे राष्ट्रासाठी कार्य करणार!’ या प्रदर्शनामुळे विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि समाजातील सर्व स्तरांमध्ये स्वाभिमान, शौर्य आणि सनातन संस्कृतीबद्दल अभिमानाची भावना दृढ झाली आहे. ‘शौर्यजागरापासून राष्ट्रजागरापर्यंत’ या ध्येयाने आयोजित हे प्रदर्शन दिल्लीच्या सांस्कृतिक इतिहासातील प्रेरणादायी उपक्रम ठरला आहे.










