Pune : नववर्षात ‘या’ मार्गांवर धावणार ई-डबल डेकर बस; पुणेकरांना मिळणार अत्याधुनिक सुविधा

By: Editor_Pratik

On: Thursday, December 18, 2025 12:41 PM

Google News
Follow Us

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) शहरातील सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने २५ इलेक्ट्रिक डबल डेकर बस खरेदी करण्याचा अंतिम निर्णय घेतला आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, नव्या वर्षात पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील प्रमुख मार्गांवर या अत्याधुनिक बस धावताना दिसणार आहेत.

पीएमपीच्या संचालक मंडळाने यापूर्वीच ई-डबल डेकर बस खरेदीस मान्यता दिली होती. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात हिंजवडी, भोसरी, कोरेगाव पार्क, विमाननगर आदी भागांतील रस्त्यांवर दहा दिवसांची यशस्वी चाचणी घेण्यात आली. या चाचणीदरम्यान बसची बॅटरी कार्यक्षमता, प्रवासी क्षमता आणि रस्त्यांवरील चालण्याची क्षमता यांचा अभ्यास करण्यात आला.

इलेक्ट्रिक बस असल्याने बॅटरी कार्यक्षमतेचा सखोल अभ्यास करण्यासाठी पीएमपीकडून तीन सदस्यांची विशेष समिती नेमण्यात आली होती. समितीचा अहवाल सकारात्मक आल्यानंतर अखेर २५ ई-डबल डेकर बस ताफ्यात समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

डबल डेकर बसमुळे एका वेळी अधिक प्रवाशांची वाहतूक शक्य होणार असून, गर्दीच्या वेळेत पुणे व पिंपरी-चिंचवडकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबईत डबल डेकर बसला मिळणाऱ्या चांगल्या प्रतिसादाच्या धर्तीवर पुणे-पिंपरीकरांनाही ही सुविधा उपलब्ध करून देण्याचा पीएमपीचा प्रयत्न आहे.

संपूर्ण वातानुकूलित, प्रदूषणमुक्त आणि जादा प्रवासी वाहून नेण्याची क्षमता असलेल्या या बस शहरातील वाहतूककोंडी कमी करण्यासही मदत करणार आहेत. बस ताफ्यात दाखल झाल्यानंतर प्रवाशांच्या प्रतिसादानुसार अंतिम मार्ग निश्चित केले जाणार असल्याची माहिती पीएमपी प्रशासनाने दिली आहे.

या मार्गांवर धावणार ई-डबल डेकर बस

  • हिंजवडी फेज ३ ते हिंजवडी फेज ३ (वर्तुळ मार्ग)

  • रामवाडी मेट्रो स्टेशन ते खराडी

  • मगरपट्टा सिटी ते कल्याणीनगर मेट्रो स्टेशन

  • पुणे स्टेशन ते लोहगाव विमानतळ

  • देहू ते आळंदी

  • चिंचवड ते हिंजवडी

ई-डबल डेकर बसची वैशिष्ट्ये

  • प्रवासी क्षमता : ६० बसून, २५ उभे (एकूण ८५)

  • आकारमान : उंची ४.७५ मीटर, रुंदी २.६ मीटर, लांबी ९.५ मीटर

  • अंदाजे किंमत : प्रत्येकी सुमारे २ कोटी रुपये

नववर्षात सुरू होणारी ही हायटेक सेवा पुणेकरांच्या दैनंदिन प्रवासाला अधिक आरामदायी, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक बनवणार असल्याचे चित्र आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026