नागपूर : विशिष्ट ठिकाणाहून विशिष्ट रेल्वे मार्गावर प्रवाशांची गर्दी वाढल्याचे लक्षात आल्यास आणि त्या त्या ठिकाणाहून मागणी झाल्यास भारतीय रेल्वेकडून ‘ट्रेन ऑन डिमांड’ सुरू करण्यात येणार आहे. रेल्वे प्रशासनाने आज या संबंधाने तशी माहिती दिली असून, नागपूर, बंगळुरू, दिल्लीसह सहा ठिकाणांहून १४ स्पेशल ट्रेनची व्यवस्था केली आहे.
वेगवेगळ्या सण उत्सवांमुळे वेगवेगळ्या सिझनमध्ये अचानक रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी वाढते. अशात अचानक गर्दी वाढल्याने विविध गाड्यांमध्ये पाय ठेवायला जागा राहात नाही. अर्थात या गर्दीचा प्रवाशांनाच मोठा त्रास होतो. अशा वेळी शक्य झाल्या त्या मार्गावर रेल्वेकडून स्पेशल ट्रेन चालविण्यात येतात. मात्र, त्यातून काही मार्गावरच्या प्रवाशांनाच दिलासा मिळतो.
पाहिजे तसे गर्दीचे नियंत्रण होत नाही. आता ख्रिसमस आणि नववर्षाच्या स्वागताचे वेध लागले आहे. त्यामुळे गर्दीत दरदिवशी भर पडत आहे. ते लक्षात घेऊन मध्य रेल्वेने १४ विशेष रेल्वे सेवांची योजना आखली आहे. त्यानुसार, नागपूर, मडगाव-गोवा, बेंगळुरू, लखनौ, गोरखपूर आणि हजरत निजामुद्दीन (दिल्ली) या ठिकाणांवर गर्दी दिसल्यास तेथून ज्या मार्गावर प्रवाशांची मागणी आहे त्या मार्गावर ही स्पेशल ट्रेन चालविणार आहे.
नमूद ठिकाणांहून ज्या राज्यात किंवा शहरात प्रवाशांना जायचे आहे, त्या सर्व श्रेणीच्या प्रवाशांना जलद आणि आरामदायी प्रवासाची सोय होणार आहे. अर्थात या गाड्यांमध्ये एसी फर्स्ट क्लास, एसी टू-टियर, एसी थ्री-टियर, स्लीपर क्लास आणि जनरल सेकंड क्लास अशा सर्व वर्गांचा समावेश राहणार आहे.








