Link Road : १४ किमीचा नवा लिंक रोड; एक्सप्रेसवे आणि जेएनपीए थेट जोडणार
मुंबई–बडोदा एक्सप्रेसवेवरून थेट जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाशी (JNPA) जलद दळणवळण मिळावे, यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) नवी मुंबईत १४ किलोमीटर लांबीचा नवा लिंक रोड उभारण्याचा निर्णय घेतला आहे. विरार–अलिबाग कॉरिडॉरला होत असलेल्या विलंबामुळे हा पर्यायी मार्ग विकसित केला जात असून, त्यामुळे एक्सप्रेसवे, जेएनपीए आणि औद्योगिक पट्ट्यांमधील अंतर लक्षणीयरीत्या कमी होणार आहे.
तलासरी ते मोरबे या टप्प्यातील रस्त्याचे काम सुमारे ७० टक्के पूर्ण झाले आहे. हा मार्ग बदलापूरजवळील मोरबे परिसरातून जातो आणि माथेरानजवळील बोगद्यातून पुढे सरकतो. या बोगद्याचे काम पूर्ण झाले असून, हा रस्ता पुढे थेट जेएनपीएपर्यंत वाढवण्याचा मानस आहे.
दरम्यान, एमएसआरडीसीकडून विरार–अलिबाग कॉरिडॉरअंतर्गत २१ किमीचा मोरबे–करंजाळे मार्ग विकसित करण्याची योजना आहे. मात्र, या प्रकल्पाला विलंब होत असल्याने एनएचआयने एमएसआरडीसीवर अवलंबून न राहता स्वतःचा १४ किमीचा मार्ग पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे.
नव्या योजनेनुसार, एमएसआरडीसीच्या करंजाळेपर्यंतच्या मार्गाऐवजी मोरबे ते कळंबोळी असा २ ते ३ किमीचा जोडरस्ता तयार केला जाणार आहे. मोरबे–तळोजा बोगद्यातून बाहेर पडणाऱ्या वाहनांसाठी हा मार्ग अत्यावश्यक ठरणार असून, तो एमआयडीसी परिसराशी थेट जोडला जाणार आहे. त्यामुळे स्वतंत्र १४ किमी रस्ता उभारण्याऐवजी एमआयडीसीतील विद्यमान रस्त्यालाच मंजुरी देण्यात आली आहे.
या संपूर्ण प्रकल्पाचा अंदाजे खर्च १०० कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता असून, प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर नवी मुंबई–जेएनपीए वाहतूक अधिक वेगवान आणि सुरळीत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.









