BIG NEWS : कामगारांचा बाबा हरपला; ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचं निधन

BIG NEWS : कामगारांचा बाबा हरपला; ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचं निधन

पुणे : कामगार, शेतकरी आणि कष्टकरी वर्गाच्या हक्कांसाठी आयुष्यभर लढा देणारे ज्येष्ठ समाजवादी नेते व सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचे आज रात्री 8.25 वाजता निधन झाले. वयाच्या 95व्या वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. गेल्या काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती खालावत होती. प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना उपचारासाठी पुण्यातील पुना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रुग्णालयात जाऊन बाबा आढाव यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. विशेष म्हणजे, आठवड्याभरापूर्वीच समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांच्या निधनानंतर शरद पवारांनी सोशल मीडियावरून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली होती.

बाबा आढाव यांच्यावर हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अभिजित वैद्य यांच्यासह तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपचार करत होती. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना आयसीयुमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र अखेर उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्याने “कष्टकऱ्यांसाठी झटणारा, समाजवादी विचारांचा दीपस्तंभ” महाराष्ट्राने गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.

1970 च्या दशकात बाबा आढाव पुणे महापालिकेचे नगरसेवक होते. ते तात्कालीन समाजवादी पक्षाचे सक्रिय सदस्य होते. कामगार आणि रिक्षाचालकांच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या रिक्षा पंचायतीचे नेते म्हणून त्यांनी मोठं काम केलं. तसेच ‘एक गाव एक पाणवठा’ मोहिम राबवून सामाजिक ऐक्य आणि समतेचा प्रसार करणारे ते प्रणेते ठरले. सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख संपूर्ण राज्यात दृढ होती.

अखेरच्या दिवसांपर्यंत सामाजिक प्रश्नांवर स्पष्ट भूमिका घेत त्यांनी जनआंदोलनाचा धागा सोडला नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीनंतर देशातील राजकीय घडामोडींवर त्यांनी तीक्ष्ण भाष्य केले होते.
ते म्हणाले होते —

“सत्ता मिळवण्यासाठी आज सर्वत्र धडपड सुरू आहे. माणूस सकाळी कुठे असतो आणि संध्याकाळी कुठे, याचा नेम नाही. पण शेवटी 140 कोटी जनता ठरवते की कोणाचं काय.”

राजकीय अस्थिरतेवर टीका करत 93 व्या वर्षीही त्यांनी आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला, हे त्यांच्या लढाऊ वृत्तीचं प्रतीक ठरलं.

बाबा आढाव यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळींना मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचे संघर्षमय कार्य आणि समाजवादी मूल्यांसाठीची निष्ठा पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील.