Phaltan Doctor Case : ‘ती’ 23 तारखेची रात्र; रूम नंबर 114 अन् 17 तासांचे रहस्य! डॉक्टर तरूणीच्या प्रकरणातील हॉटेल रूममधील वस्तुस्थिती नेमकी काय?

Phaltan Doctor Case : फलटण शहरातील डॉक्टर तरुणी आत्महत्येप्रकरणी (Phaltan Doctor Case) त्या रात्रीचा संपूर्ण घटनाक्रम हॉटेलचे संचालक रणजीत भोसले यांनी बुधवारी (२९ ऑक्टोबर) पत्रकार परिषदेत उलगडला.

बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या…

२३ ऑक्टोबरच्या मध्यरात्री १.२३ वाजता ती डॉक्टर तरुणी दुचाकीवरून एकटीच हॉटेलमध्ये आली. “मी बारामतीला चालली आहे. रस्ता लांब आहे, मी एकटी आहे; फक्त एक रात्र राहू द्या,” अशी विनंती तिने वॉचमनकडे केली. त्यानंतर तिला आत सोडण्यात आले.

अगदी तीन मिनिटांत ती रिसेप्शनवर पोहोचली. तिने नाव नोंदवून आधार कार्ड दिले. “पेमेंट सकाळी करते,” असे सांगून ती रात्री १.३० वाजता रूम क्रमांक ११४ मध्ये गेली.

सतरा तासांची शांतता

सकाळी ११ वाजेपर्यंत त्या रुमचे दार न उघडल्याने मॅनेजरने दार ठोठावले; प्रतिसाद मिळाला नाही. दुपारी ४ वाजता पुन्हा प्रयत्न केला तरीही काहीच प्रतिसाद नव्हता. संचालक रणजीत भोसले यांना कळवून सायंकाळी ६.४५ वाजता डुप्लिकेट चावीने रुम उघडण्यात आली.

यावेळी व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू ठेवण्यात आले. आतमध्ये डॉक्टर तरुणी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळली.

“आत्महत्या हीच वस्तुस्थिती”

या प्रकरणावर राजकीय कटकारस्थानाचे आरोप होत आहेत. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी हॉटेल संचालकांबाबत संशय व्यक्त करत काही फोटो दाखवले.
पण “हत्या हा राजकीय शब्द आहे, प्रत्यक्षात ही आत्महत्या आहे. आमचा बदनाम करण्यासाठी विरोधकांनी कट रचला,” असा दावा हॉटेलचे मालक दिलीपसिंह भोसले यांनी केला.

“तरुणी फ्रस्ट्रेशनमध्ये दिसत होती”

दिलीपसिंह भोसले यांनी सांगितले की, हॉटेलमध्ये आल्यानंतर तरुणी थोडी निराश दिसत होती. कर्मचाऱ्यांनीही हेच सांगितल्याचे त्यांनी नमूद केले. सीसीटीव्हीतही तिचा चेहरा आणि देहबोली उदास व ताणतणावात दिसत असल्याचे त्यांनी सांगितले.

फलटणमध्ये सुरू असलेली विकासाची वाटचाल विरोधकांना न पटल्यानेच या प्रकरणाला राजकीय रंग दिला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

पीडित कुटुंबाचा आवाज; राहुल गांधींनी घेतली माहिती

दरम्यान, या तरुणीच्या मृत्यूनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही फोनवरून कुटुंबीयांशी संवाद साधला. कुटुंबीयांनी या प्रकरणी “एसआयटी चौकशी आणि आरोपींना फाशी”ची मागणी केली.

राहुल गांधी यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेत आश्वासन दिले की, “काळजी करू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत.”

हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकरणात मुख्यमंत्री पोलीस तपासात हस्तक्षेप करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.