Maharashtra HSC form filling 2025: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्याकरिता ३ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विलंबशुल्कासह हे अर्ज सादर करावे लागणार आहेत. याआधी, विद्यार्थ्यांनी २० ऑक्टोबरच्या आत परीक्षांचे अर्ज भरावयाचे होते.
राज्य मंडळाची बारावी आणि दहावीची शालांत परीक्षा फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात होणार आहे. या परीक्षेला बसू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरावयाचे आहेत. कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत यु-डायस आणि पीईएन-आयडी वापरून हे अर्ज मंडळाकडे सादर करण्यात येतील.
अघोरी प्रकार उघडकीस: रस्त्याच्या मध्यभागी प्राण्याचं काळीज ठेवून भानामती, ग्रामस्थांत भीतीचे वातावरण
व्यवसाय अभ्यासक्रम घेणारे नियमित विद्यार्थी, सर्व शाखांचे पुनर्परीक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेंतर्गत तसेच तुरळक किंवा आयटीआयचे विषय घेऊन प्रविष्ट झालेले विद्यार्थी यांना या परीक्षेचे अर्ज कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांमार्फत भरावयाचे आहेत.
त्यासाठी आता, नियमित शुल्कासह ३ नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरता येतील. नियमित व विलंब शुल्काने अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क मंडळाकडे जमा करण्यासाठी ७ नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या याद्या व प्रीलिस्ट विभागीय मंडळांकडे जमा करण्यासाठी १० नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
दरम्यान, दहावीचे अर्ज भरण्यासाठी २७ ऑक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना आणि कनिष्ठ महाविद्यालयांना अर्ज भरणे सोयीचे व्हावे याकरिता ही मुदतदेखील वाढविली जाण्याची शक्यता आहे.
दहावी आणि बारावीच्या परीक्षेला खासगीरीत्या फॉर्म क्रमांक १७ भरून प्रविष्ट होण्यासाठी १५ ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. आता विलंबशुल्कासह ३१ ऑक्टोबरपर्यंत हे अर्ज सादर करता येतील. बारावीची लेखी परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्च आणि दहावीची लेखी परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च दरम्यान होईल.









