मोहोळ नमले अन् धंगेकर जिंकले; जैन बोर्डिंगच्या जागेचा वाद मिटला : बिल्डर विशाल गोखलेंचा व्यवहार रद्द करण्याचा निर्णय, मोहोळांसह सगळ्यांना जिलेबी भरवणार – धंगेकर

पुण्यातील जैन बोर्डिंग ट्रस्टच्या जागेवरून सुरू असलेला वाद अखेर संपुष्टात आला आहे. बिल्डर विशाल गोखले यांनी जैन बोर्डिंग ट्रस्टसोबतचा जागेचा व्यवहार रद्द करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय त्यांनी ई-मेलद्वारे जैन ट्रस्टला कळवला आहे.

जैन बोर्डिंगच्या जागेच्या विक्रीवरून पुणे आणि राज्याच्या राजकारणात मोठे वादळ उठले होते. या प्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी भाजप खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप केले होते. मात्र, मुरलीधर मोहोळ यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. दरम्यान, सदर प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रविंद्र धंगेकर यांच्यात देखील चर्चा झाली होती. आपण या प्रकरणी दोन दिवसांत तोडगा काढू, असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी रवींद्र धंगेकर यांना दिले होते.

नैतिकतेच्या मुद्द्यावर व्यवहार रद्द – बिल्डर गोखले

विशाल गोखले यांनी जैन बोर्डिंग हॉस्टेलचे चेअरमन आणि ट्रस्टी यांना पाठवलेल्या ई-मेलमध्ये हा व्यवहार रद्द करत असल्याची माहिती दिली आहे. विशेष म्हणजे, नैतिकतेच्या मुद्द्यावर या व्यवहारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे गोखले यांनी स्पष्ट केले आहे. “जैन धर्मियांच्या भावना दुखवायच्या नव्हत्या,” असेही त्यांनी नमूद केले आहे. त्यांनी धर्मादाय आयुक्तालयालाही पत्र पाठवून व्यवहार रद्द झाल्याबद्दल योग्य ती कार्यवाही करण्यास सांगितले आहे.

काही दिवसांपूर्वी धर्मादाय आयुक्तांनी या व्यवहाराला स्थगिती दिली होती. गोखले बिल्डर्सकडून या जमीन व्यवहारासाठी जैन बोर्डिंग हाऊसला 230 कोटी रुपये देण्यात आले होते. हे पैसे लवकरात लवकर परत देण्यात यावेत, अशी मागणी विशाल गोखले यांनी ई-मेलमध्ये केली आहे.

मोहोळांसह सगळ्यांना जिलेबी भरवणार – धंगेकर

दरम्यान, दोन दिवसात जैन बोर्डिंगचा व्यवहार पूर्णपणे रद्द झाला, तर मुरलीधर मोहोळ यांच्यासह सगळ्यांना जिलेबी भरवणार असल्याचे रवींद्र धंगेकर यांनी म्हटले आहे. एकनाथ शिंदे यांनी सांगितलं 2 दिवसात तोडगा निघेल, त्यामुळे पुढील दोन दिवस मुरलीधर मोहोळ यांच्याबद्दल मी काहीही बोलणार नाही, असेही रवींद्र धंगेकर म्हणाले.

जैन बोर्डिंगचा वाद काय होता?

जैन बोर्डिंग हॉस्टेलची स्थापना 1958 साली हिराचंद नेमचंद दोषी यांनी केली होती. अलीकडे या जागेच्या पुनर्विकासाचा विषय चर्चेत आला होता, मात्र विक्री प्रक्रियेत अनियमितता आणि परस्पर व्यवहार झाल्याचे आरोप करण्यात आले होते. काही महिन्यांपूर्वी विश्वस्तांनी जागेचा नवीन विकास करण्याचा निर्णय घेतला, पण जैन समाजातील काही लोकांनी त्याला विरोध केला. त्यानंतर ही जागा परस्पर विकण्यात आल्याचा आरोप जैन समाजाने केला. या जागेच्या विक्रीला धर्मादाय आयुक्तांनी मंजुरी देताना नियम पायदळी तुडवल्याचा आणि गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्याशी संबंध असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. गोखले यांनी व्यवहार रद्द केल्यामुळे आता हा वाद मिटल्याचे दिसत आहे.