EPFO Rule : खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी EPFO योजना आर्थिक सुरक्षेची हमी देते. ईपीएफओच्या नियमानुसार, 20 किंवा त्याहून अधिक कर्मचारी असलेल्या प्रत्येक कंपनीला ईपीएफ योजनेअंतर्गत नोंदणी करणे बंधनकारक आहे. या योजनेत कर्मचारी आणि कंपनी दोघांचाही समान वाटा असतो. त्यामुळे निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना मोठ्या रकमेचा फायदा मिळतो.
ईपीएफओच्या नियमानुसार, कर्मचाऱ्याच्या ठरावीक वेतन आणि महागाई भत्त्याच्या 12 टक्के रक्कम कर्मचारी आपल्या पगारातून ईपीएफमध्ये जमा करतो आणि इतकीच रक्कम कंपनीकडून जमा केली जाते. मात्र काहीवेळेस कंपन्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधीत योग्य प्रमाणात योगदान करत नाहीत. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना त्यांच्या नियुक्तीनंतर कमी रक्कम जमा केली आहे का हे जाणून घेण्याची गरज असते.
ईपीएफ योगदान तीन भागांमध्ये विभागले जाते .
१. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF)
२.कर्मचारी पेन्शन योजना (EPS)
३. कर्मचारी जमा लिंक्ड विमा योजना (EDLI)
यामध्ये कंपनीकडून 12 टक्के योगदान दिले जाते. त्याततले 8.33 टक्के कर्मचारी पेन्शन योजनेत (EPS) आणि उर्वरित 3.67 टक्के कर्मचारी भविष्य निर्वाह निधीत (EPF) जमा केले जाते. यामुळे कर्मचारी निवृत्ती, पेन्शन आणि विमा या तीनही सुविधा मिळवू शकतो.
जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमची कंपनी तुमच्या पीएफ खात्यात कमी रक्कम जमा करत आहे, तर तुम्ही ते काही मिनिटांत तपासू शकता. ईपीएफओ सदस्य पोर्टलवर लॉगिन करून ‘पासबुक’ पर्यायातून आपल्या खात्यातील सर्व व्यवहार पाहता येतात. पासबुकमध्ये दरमहा कंपनी आणि कर्मचाऱ्याने केलेले योगदान, जमा झालेली व्याजरक्कम आणि आत्तापर्यंतची एकूण शिल्लक याची सविस्तर माहिती मिळते.
अलीकडेच ईपीएफओने ‘Passbook Lite’ ही नवी सुविधा सुरू केली आहे. या फीचरच्या मदतीने सदस्यांना त्यांच्या EPF खात्याची थोडक्यात माहिती एका क्लिकवर मिळते. यासाठी तुम्ही EPFO सदस्य पोर्टल वर लॉगिन करून UAN क्रमांक आणि पासवर्डच्या मदतीने प्रवेश करू शकता.
याशिवाय उमंग (UMANG) अॅपच्या माध्यमातूनही पासबुक पाहणे आणि डाउनलोड करणे शक्य आहे. उमंग अॅपमध्ये EPFO शोधा, ‘View Passbook’ पर्याय निवडा, नंतर तुमचा UAN क्रमांक आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर टाका. ओटीपी सबमिट केल्यानंतर तुमचा ई-पासबुक डाउनलोड करता येतो.









