दिवाळीचा सण आता संपला तरीही नागरिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. अनेकजण दिवाळीनिमित्त बाहेर फिरण्याचा प्लॅन करत आहेत. अशातच सणांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी आणि त्यांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे.
दिवाळी आणि छठ पुजेमुळे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि नागपूर दरम्यान अतिरिक्त ‘एसी सुपरफास्ट विशेष’ गाड्या चालवण्याची घोषणा मध्य रेल्वेने केली आहे. या गाडीला जळगाव आणि भुसावळ स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे, ज्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांनाही याचा लाभ होणार आहे.
विशेष गाड्यांचे वेळापत्रक : ०१००५ सीएसएमटी-नागपूर एसी सुपरफास्ट: ही विशेष गाडी २५ ऑक्टोबर २०२५ रोजी मध्यरात्री ००.२० वाजता (रात्री १२ वाजून २० मिनिटांनी) सीएसएमटी, मुंबईहून सुटेल. ती त्याच दिवशी संध्याकाळी १५.३० वाजता (दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी) नागपूर येथे पोहोचेल.
०१००६ नागपूर-सीएसएमटी एसी सुपरफास्ट विशेष: नागपूरहून ही विशेष गाडी २५ ऑक्टोबर २०२५ रोजी संध्याकाळी १८.१० वाजता (०६ वाजून १० मिनिटांनी) सुटेल. ती दुसऱ्या दिवशी सकाळी ०८.२५ वाजता सीएसएमटी, मुंबई येथे पोहोचेल.
अघोरी प्रकार उघडकीस: रस्त्याच्या मध्यभागी प्राण्याचं काळीज ठेवून भानामती, ग्रामस्थांत भीतीचे वातावरण
थांबे आणि रचना : या विशेष गाड्या दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा या स्थानकांवर थांबतील. या गाड्यांच्या रचनेत २० वातानुकूलित (AC) थ्री-टिअर (3-Tier) डबे आणि २ जनरेटर कार असणार आहेत.
दरम्यान, या विशेष गाड्यांसाठीची आरक्षण प्रक्रिया सर्व कम्प्युटरीकृत आरक्षण केंद्रे आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर सुरू झाली आहे. या विशेष गाड्यांचे थांबे आणि वेळेची सविस्तर माहिती मिळवण्यासाठी प्रवाशांनी www.enquiry.indianrail.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी किंवा एनटीईएस ॲप डाऊनलोड करावे.





