कोल्हापूर | हातकणंगले तालुक्यातील इंगळी गावात दिवाळीच्या मध्यरात्री भानामतीसदृश अघोरी प्रकार समोर आला आहे. गावाच्या प्रवेशद्वाराखालील मुख्य रस्त्याच्या मधोमध पांढऱ्या कापडावर जनावराचं काळीज ठेवून, त्याभोवती केळी, लिंबू, कुंकू-गुलाल आणि केळीच्या डहाळ्या मांडून काही अघोरी पूजा केल्याचे उघड झाले. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेचा उलगडा कसा झाला?
दिवाळी पाडव्याच्या सकाळी गावातील काही नागरिकांनी स्वागत कमानीखाली रस्त्याच्या मध्यभागी विचित्र वस्तू ठेवल्याचे पाहिले. जवळ जाऊन पाहिल्यावर पांढऱ्या कापडावर जनावराचं काळीज, त्यावर कुंकू-गुलाल, लिंबू आणि केळींची मांडणी असल्याचे दिसून आले. काही क्षणांतच या घटनेची बातमी गावभर पसरली आणि लोकांमध्ये खळबळ उडाली.
पोलिसांचा तातडीने तपास
घटनेची माहिती मिळताच हुपरी पोलिसांनी त्वरित घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला व सर्व साहित्य ताब्यात घेतले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर, मध्यरात्री आठ ते दहा तरुण गावातील मुख्य रस्त्यावर फिरताना आणि हे साहित्य ठेवताना दिसल्याचे आढळले. त्यानुसार पोलिसांनी काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
‘प्रँक’ की काहीतरी वेगळं?
प्राथमिक चौकशीत काही संशयितांनी हा प्रकार केवळ ‘प्रँक’ म्हणून केल्याचे सांगितले आहे. मात्र पोलिसांनी तपास अद्याप सुरू असल्याचे सांगत, अंतिम निष्कर्ष तपासाअंतीच जाहीर केला जाईल, असे स्पष्ट केले आहे.
ग्रामस्थ आणि संघटनांचा निषेध
इंगळी ग्रामस्थ, कोल्हापूरकर नागरिक आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला आहे. “अंधश्रद्धा पसरवणाऱ्या आणि समाजात भीती निर्माण करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई व्हावी,” अशी मागणी करण्यात आली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनीही या घटनेविरोधात भूमिका घेतली आहे.
दरम्यान, पोलिस प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून, गावात अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. तपास अधिकारी या प्रकरणामागील हेतू, आरोपींची ओळख आणि उद्दिष्ट शोधत आहेत.
या अघोरी प्रकारामुळे दिवाळीच्या सणाचा उत्साह काहीसा मंदावला असून, इंगळी गावात भीती आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे.









