वाघोली, लोहगावमुळे जुन्या या प्रभागांचे झाले तुकडे !

पुणे : महानगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या वाघोली, लोहगाव या दोन गावांमुळे पुण्याच्या पूर्व भागात असलेल्या वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील प्रभागांच्या रचनेत अनेक बदल झाले आहेत. जुन्या प्रभागांचे तुकडे पाडण्यात आल्याने मतदारांपर्यंत पोहोचताना उमेदवारांची दमछाक होणार असून, विद्यमान आमदार आणि माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

कळस, धानोरी, वाघोली, खराडी, येरवडा, लोहगाव, विमाननगर, कल्याणीनगर, नागपूरचाळ, फुलेनगर, गांधीनगर या प्रमुख भागांचा समावेश वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील प्रभागांमध्ये होतो. या मतदारसंघांमध्ये सहा प्रभाग येतात. नवीन प्रभाग रचनेमध्ये येरवडा- गांधीनगर प्रभाग क्रमांक सहा या प्रभागांचे तीन तुकडे झाले आहेत. जुन्या प्रभागात समाविष्ट असलेला काही भाग शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील प्रभागाला, काही भाग नदी ओलांडल्यानंतर पुणे कॅन्टोन्मेंटमधील प्रभागात समाविष्ट करण्यात आला आहे. तर खराडीचा काही भाग बाजूला असलेल्या हडपसर मतदारसंघातील मांजरी हडपसर प्रभागाला जोडण्यात आला आहे.

माजी आमदार जगदीश मुळीक यांचा भाग असलेल्या वडगाव शेरी प्रभागात फारसे बदल झालेले नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे शहराध्यक्ष, माजी आमदार सुनील टिंगरे यांचे वर्चस्व असलेल्या टिंगरेनगरला प्रभाग क्रमांक तीनमधील काही भाग जोडण्यात आला आहे. त्यामध्ये जयप्रकाश नगर, बर्मासेल, ठोसे पार्क, कलवड हा भाग जोडण्यात आला आहे. या मतदारसंघामध्ये दोन प्रभाग असे आहेत ज्यांची हद्द नदीची सीमारेषा ओलांडून जोडण्यात आल्याचा आरोप केला जात आहे.

चार सदस्यांचे सहा प्रभाग असलेल्या या मतदारसंघात महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व राहिले आहे. २४ पैकी १४ जागांवर भाजपला विजय मिळविता आला होता. यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांचा समावेश होता. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार बापू पठारे सध्या या भागाचे नेतृत्व करत आहेत. या प्रभागांमध्ये भाजप, आरपीआयसह शिवसेनेला मानणारा वर्ग मोठा आहे.

मतदारसंघात येणाऱ्या कळस – धानोरी प्रभाग क्रमांक एकची रचना पूर्वीप्रमाणेच ठेवण्यात आली आहे. महापालिकेच्या हद्दीत लोहगावचा समावेश झाल्याने हा भाग या प्रभागाला जोडण्यात आला आहे. फुलेनगर-नागपूर चाळ प्रभागातील पूर्वीचा बर्माशेल, कलवड, खेसे पार्क हा भाग येथून तोडण्यात आला आहे. लोहगाव-विमाननगरला वडगाव शेरीचा भाग असलेला सोमनाथनगर, गणेशनगरचा काही भाग जोडण्यात आला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत या भागातून महाविकास आघाडीला चांगली मते पडली होती.

आगामी महापालिकेच्या निवडणुकीत या मतदारसंघातील प्रभागांमध्ये संमिश्र चित्र दिसण्याची शक्यता आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या निर्णयानंतर प्रभागांमधील समीकरणे बदलणार असल्याचे बोलले जात आहे. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाची महायुती असतानाही या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे बापू पठारे आमदार झाले आहेत. त्यांची वडगाव शेरी भागात ताकद आहे.

महापालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुती न झाल्यास माजी आमदार मुळीक आणि टिंगरे यांना उमेदवार निवडून आणण्यासाठी जोरदार ताकद लावावी लागणार आहे. महायुतीने एकत्रित निवडणूक लढविण्याचे ठरविल्यास विद्यमान आमदार पठारे विरुद्ध दोन माजी आमदार, अशी लढत येथे पाहायला मिळेल.

शिवसेनेचे माजी नगरसेवक संजय भोसले यांच्या प्रभागात बदल करण्यात आले आहेत. भोसले यांना ज्या भागातून अधिक मतदान होते तोच भाग दुसऱ्या प्रभागामध्ये जोडण्यात आला आहे. कळस-धानोरी प्रभागातील विश्रांतवाडीमधील काही भाग फुलेनगर-नागपूर चाळला जोडण्यात आला आहे.

प्रभाग क्रमांक प्रभागाचे नाव

  • १ कळस – धानोरी
  • २ फुलेनगर – नागपूरचाळ
  • ३ विमाननगर – लोहगाव
  • ४ खराडी – वाघोली
  • ५ कल्याणीनगर – वडगाव शेरी
  • ६ येरवडा – गांधीनगर