Lalbaugcha Raja Visarjan : जगभरातील गणेशभक्तांच्या जिव्हाळ्याचा लालबागचा राजा यंदा विसर्जनात अडचणीत सापडला आहे. गेल्या पाच तासांपासून गिरगाव चौपाटीवरील समुद्रात ही मूर्ती चार ते पाच फूट पाण्यात बसलेली असून, किनाऱ्यावर उपस्थित भक्त आणि मंडळाचे कार्यकर्ते चिंतेत आहेत.
यंदा विसर्जनासाठी स्वयंचलित हायड्रोलिक्स यंत्रणेसह नवा तराफा तयार करण्यात आला होता. मात्र, पाट जड झाल्याने मूर्ती त्या तराफ्यावर चढत नाही. परिणामी विसर्जन रखडले असून, भक्तांच्या चेहऱ्यावर काळजीचे सावट आहे.
22 तासांची मिरवणूक, पण विसर्जनात अडथळा
लालबागचा राजा काल सकाळी 10 वाजता मंडपातून निघाला होता. तब्बल 22 तास चाललेल्या मिरवणुकीनंतर आज सकाळी 8 वाजता गिरगाव चौपाटीवर आगमन झाले. आरतीनंतर दीड-दोन तासांत विसर्जन होणे अपेक्षित होते. पण समुद्राला आलेल्या भरतीमुळे पाट जड झाला आणि गणपती पाण्यातच बसून राहिला.
भक्तांची कालवाकालव
गेल्या साडेतीन तासांपासून मूर्ती समुद्रात अर्धवट बुडालेली असल्याने भक्त अस्वस्थ झाले आहेत. किनाऱ्यावरून अनेकजण “बाप्पा, आमच्याकडून काही चुकलं असेल तर माफ कर, यापुढे सेवेत हयगय होणार नाही” अशी आर्जवे करत आहेत.
तराफ्यावर चढवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
मागील वर्षांच्या तुलनेत यंदाचा तराफा दुप्पट मोठा आहे. भरतीमुळे तो सतत हलत असून, हायड्रोलिक प्रणालीने मूर्ती वर घेण्यात अडचणी येत आहेत. सकाळी साडेनऊपासून सुरू झालेले प्रयत्न अद्याप सुरूच आहेत. कोळी बांधव आणि मंडळाचे कार्यकर्ते मिळून गणपतीला तराफ्यावर चढवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
यापूर्वी लालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी असा प्रसंग कधी घडला नव्हता. त्यामुळे या वर्षीचा विसर्जन सोहळा भक्तांच्या हृदयात वेगळीच आठवण ठेऊन जाणार आहे.