Coastal Link Road : केंद्रीय मिठागार मंत्रालयाने दहिसर–भाईंदर कोस्टल लिंक रोडसाठी लागणारी 53.17 एकर जमीन राज्य सरकारकडे हस्तांतरित केल्याने या प्रकल्पातील मोठा अडथळा दूर झाला आहे. यामुळे आगामी तीन वर्षांत हा कोस्टल लिंक रोड पूर्ण होणार असून, नरिमन पॉईंट ते मिरा-भाईंदर प्रवास अवघ्या अर्ध्या तासात होणार असल्याचा दावा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केला आहे.
सरनाईक यांनी यासाठी मागील पाच वर्षांपासून सातत्याने केंद्रीय मंत्रालय व राज्य शासनाकडे पाठपुरावा केला होता. अखेर त्याला यश मिळाल्याने हा मार्ग आता वास्तवात उतरणार आहे. मुंबई महापालिकेने या प्रकल्पासाठी आधीच निविदा काढली असून, कामाचा ठेका मेसर्स एलअॅडटी कंपनीला देण्यात आला आहे. सुमारे ३ हजार कोटी रुपयांचा खर्च करून हा रस्ता उभारण्यात येणार आहे.
हा रस्ता मुंबईच्या उत्तन भागातून दहिसर, मीरा-भाईंदर मार्गे वसई-विरारला जोडला जाणार आहे. स्थानिक मच्छीमारांच्या विरोधामुळे उत्तन सी-लिंकऐवजी जमिनीवरील मार्गाचा पर्याय निवडण्यात आला. पुढे हा मार्ग वसई-विरारहून डहाणू येथील वाढवण बंदरापर्यंत वाढवला जाणार आहे.
या प्रकल्पामुळे मिरा-भाईंदर शहराला थेट लाभ होणार असून, हे शहर मुंबई महानगराच्या अधिक जवळ येणार आहे. भविष्यात मिरा-भाईंदर शहर मुंबईचे उपनगर म्हणून ओळख निर्माण करेल, असा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला.