पुणे – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी आदर्श गणेशोत्सव मोहीम राबवण्यात आली. उत्सवांमधील गैरप्रकार रोखले जावेत, श्रीगणेशाची विटंबना रोखली जावी, धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि पूजा व्हावी या उद्देशाने ही मोहीम राबवण्यात आली. उत्सवकाळात देवी-देवतांचे विडंबन होऊ नये यासाठी योग्य ती काळजी घेतली जावी, यासाठी गणेशोत्सवापूर्वी जिल्हाधिकारी श्री. जितेंद्र डूडी, पुणे महानगरपालिका आयुक्त श्री. नवल किशोर राम, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना, तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका, शिरवळ ग्रामपंचायत या ठिकाणी हिंदु जनजागृती समितीकडून निवेदन देण्यात आली होती.

या मोहिमेअंतर्गत समितीच्या शाखांच्या माध्यमातून ३३ ठिकाणी प्रवचने घेण्यात आली. प्रवचनांतून श्रीगणेशमूर्तीविषयी शास्त्रीय माहिती, पूजाविधी आणि गणेशोत्सवातील गैरप्रकार रोखले जावेत यासाठी प्रबोधन करण्यात आले. या प्रबोधनामुळे अशास्त्रीय वेशभूषेतील असलेल्या मूर्ती घेण्याऐवजी पाटावर बसलेल्या आणि पारंपारिक वेशभूषेतील मुर्त्या घेण्याचे प्रमाण गणेशभक्तांमध्ये वाढल्याचे दिसून आले आणि सामाजिक माध्यमांतूनही या विषयी पुष्कळ जागृती झाली.

प्रवचनांमध्ये लव्ह जिहाद, अर्बन नक्षलवाद याविषयीही जागृती करण्यात आली. काही मंडळे, सोसायटी यांमध्ये समितीच्या कार्यकर्त्यांनी स्वसंरक्षण प्रशिक्षणाची प्रात्याक्षिके सादर केली. समितीच्या कार्यकर्त्यांनी अनंत चतुर्दशीला लकडी पूल श्रीविठ्ठल मंदिर येथे प्रथमोपचार कक्ष आणि धर्मशिक्षण देणारे फलक लावले. या फलकांना गणेशभक्तांचा चांगला प्रतिसाद मिळाला. विविध गणपती मंडळांमध्ये, तसेच सामूहिकरित्या 25हून अधिक ठिकाणी धर्मप्रेमींनी पुढाकार घेऊन हिंदु राष्ट्राच्या कार्यात सहभागी होण्याची प्रतिज्ञा केली.
