श्राद्धविधी : अंधश्रद्धा नाही, तर शास्त्र !
प्रस्तावना : हिंदु धर्मामध्ये पूर्वजांना सद्गती देण्यासाठी श्राद्धविधी सांगितला आहे; पण काही महाभाग कुठल्याही अभ्यासाविना श्राद्धाविषयी अपसमज पसरवतात. उदाहरणार्थ,
‘श्राद्धविधी ही अंधश्रद्धा असून तो ब्राह्मणांचे पोट भरण्यासाठी सांगितलेला विधी आहे’, ‘श्राद्धविधी म्हणजे थोतांड आहे’, ‘श्राद्ध करण्यापेक्षा रुग्णालय किंवा शाळा यांना दान द्या’, ‘श्राद्ध करण्यापेक्षा जिवंतपणीच आई-वडिलांची काळजी घ्या’ आदी. धर्मशिक्षणाच्या अभावामुळे किंवा सनातन परंपरांचे पालन खंडित झाल्यामुळे अनेक जण श्राद्धाविषयी पसरवल्या जाणार्या गैरसमजुतींना बळी पडतात. तसे होऊ नये आणि पितरांच्या सद्गतीसाठी आणि पर्यायाने मनुष्याच्या कल्याणासाठी असणारा शास्त्रोक्त श्राद्धविधी सर्वांनी प्रत्येकाने श्रद्धेने करावा, यासाठी हा लेखप्रपंच !
श्राद्धविधीद्वारे दिवंगत पितरांना ऊर्जा मिळणे : ‘देहाचा नाश झाला, तरी जिवाचा नाश होत नाही’, ‘प्रत्येक व्यक्तीला मृत्यूनंतर त्याच्या त्याच्या कर्मानुसार पुन्हा जन्म मिळतो’, हा सिद्धांत हिंदु धर्मात सांगितला आहे. थोडक्यात, ‘कर्मफलसिद्धांत’ आणि ‘पुनर्जन्मसिद्धांत’ हिंदु धर्मात प्रतिपादित केले आहेत. कुणी हे सिद्धांत मानो अथवा न मानो, हे सिद्धांत सर्वांना लागू आहेत. यानुसार ज्या पूर्वजांना मृत्योत्तर सद्गती मिळाली नसेल, त्यांना श्राद्ध, तर्पण, पिंडदान आदी विधींच्या माध्यमातून सद्गती मिळण्यासाठीची उर्जा प्राप्त होते. मत्स्यपुराणामध्ये पिंडोदक क्रियेमुळे पितर कसे तृप्त होतात, याचे वर्णन केले आहे. श्राद्धकर्मामध्येही जे पिंडोदक दिले जाते, त्या माध्यमातून दिवंगत पितरांना ते त्यांच्या उचित आहाराच्या रूपात प्राप्त होते. श्राद्धातील मंत्रोच्चारांमध्ये पितरांना गती देण्याची सूक्ष्म शक्ती सामावलेली असते. पितरांना हविर्भाग दिला गेल्याने ते संतुष्ट होतात. श्राद्धामुळे पितरांची त्रासांतून मुक्तता होते. ब्रह्मवैवर्तपुराण सांगते, ‘देवकार्यापेक्षा अधिक महत्त्वाचे पितृकार्य आहे’; म्हणूनच सर्व मंगल कार्यांतही नांदी श्राद्धाचे विधान सर्वप्रथम असते.’
समजा भारतातील कुणा व्यक्तीला अमेरिकेतील व्यक्तीला पैसे पाठवायचे असतील, तर बॅंकेद्वारे रुपया या भारतीय चलनाचे डॉलर या अमेरिकेच्या चलनामध्ये रूपांतर होते. त्याप्रमाणे जो श्राद्ध विधी केला जातो, त्याद्वारे पितरांना ऊर्जा प्राप्त होते.
ज्याप्रमाणे वित्तक्षेत्राचा अभ्यास असेल, तर रुपयांचे रूपांतर डॉलरमध्ये कसे केले जाते, हे समजू शकते, त्याप्रमाणे हिंदु धर्माचा अभ्यास असेल, धर्मावर श्रद्धा असेल, तर या विधींमागचे शास्त्र चांगल्या प्रकारे समजू शकते.
समजा, एखाद्याच्या बँकेच्या खात्यात खूप पैसे असतील, तर इतरांच्या मदतीची आवश्यकता पडणार नाही; पण एखाद्याच्या बँकेत कमी पैसे असतील आणि अन्य कुणी त्याच्या बँकेत पैसे जमा केले, तर त्याच्या खात्याची रक्कम वाढते. त्याप्रमाणे ज्या व्यक्तीची साधना किंवा पुण्यबळ भरपूर असेल, त्यांना मृत्योत्तर सद्गती मिळते; पण ज्यांची साधना किंवा पुण्यबळ कमी असेल, त्यांना अग्नीसंस्कार, श्राद्ध, तर्पण आदी विधींच्या माध्यमातून ऊर्जा मिळते. श्राद्धामध्ये भोजनाचे ताट विशिष्ट प्रकारे वाढणे, पिंडाला कावळा शिवणे, तर्पण करणे या सर्वांच्या मागे शास्त्र आहे. कोणत्याही अभ्यासाविना त्याच्यावर टीका करणे म्हणजे खरे तर स्वतःचेच हसे करून घेण्यासारखे आहे. आज ऑक्सफोर्ड, केंब्रिज आदी विदेशी विद्यापिठांमध्ये संस्कृत, हिंदु धर्म या विषयांवरील ‘कोर्स’ शिकवले जातात. त्यामुळे श्राद्धावर मनमानी टीका करणार्यांनी थोडा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे.
श्राद्ध आणि सामाजिक कार्याला दान या भिन्न संकल्पना : काही जण श्राद्ध करण्याऐवजी गरिबांना दान द्या किंवा शाळा, रुग्णालये यांना देणगी द्या, असे आवाहन करतात. असे म्हणणे म्हणजे रोग एक आणि उपचार भलताच ! श्राद्ध आणि सामाजिक कार्याला दान या दोन्ही भिन्न संकल्पना आहेत.
श्राद्ध न करता भावनेपोटी दान केले, तर त्याने पितर प्रसन्न होत नाहीत; कारण त्या दानाचे फळ पितरांना मिळत नाही. श्राद्धाच्या माध्यमातून पितरांना अन्न मिळते. भूक शमवण्यासाठी अन्नच खावे लागते. कुणाला तरी देणगी दिली; म्हणून आपले पोट भरत नाही. तसेच श्राद्धाचे आहे. आपल्याला आजार झाला, तर आपल्याला औषध घ्यावे लागते. त्यावर मी देणगी देतो, असे म्हणून चालत नाही. मग आपण आध्यात्मिक दृष्टिकोनातून आजारी असताना त्यावर आध्यात्मिक उपाय करायला नकोत का ? एखाद्याला सामाजिक कार्याला देणगी द्यायची असेल, तर त्याने ती केव्हाही द्यावी; पण देणगी हा श्राद्धाला पर्याय नाही, हे लक्षात घ्यावे.
षडयंत्रकारी भावनिक आवाहनांना भुलू नका : ‘श्राद्ध करण्यापेक्षा जिवंतपणीच आई-वडिलांची काळजी घ्या’, असे आवाहन करणारे काही भावनिक संदेश पितृपक्षात प्रसारित केले जातात. अशांचा सूरही एकप्रकारे श्राद्ध करू नये, यासाठीचाच असतो; पण हे लक्षात घेतले पाहिजे की, हिंदु धर्माने कधीही आई-वडिलांना वार्यावर सोडा, अशी शिकवण दिलेली नाही. उलट हिंदु संस्कृतीत ‘मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव’, असे म्हटले आहे. याचा अर्थ, आई-वडिल, आचार्य, अतिथी यांना देवाच्या रूपात पहाण्याची शिकवण दिली आहे. जिवंतपणी आई-वडिलांची काळजी घेतली, तर मृत्योत्तर श्राद्ध करण्याची आवश्यकता नाही,
असा तर्क लावणेच मूढपणाचे लक्षण आहे. याचे कारण, श्राद्धादी विधी हेच मुळात मृत्योत्तर सद्गती मिळण्यासाठी असतात. एखादा चढ असेल, तर तेथे वाहने काळजीपूर्वक चालवा, अशी पाटी लावलेली असते. कुणी त्या पाटीला अनुसरून ‘आधीच वाहने नीट चालवा’, असे म्हटले, तर ते अर्थहीन असते. याचे कारण, ती पाटी चढावर गाडी चालवतांना घ्यायच्या काळजीविषयी आहे. त्यामुळे अशा प्रकारे भावनिक विधाने करणे, हा हिंदूंना धर्माचरणापासून परावृत्त करण्याचाच प्रयत्न आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. जिवंतपणी आई-वडिलांची सेवा करणे आणि त्यांचा मृत्यू झाल्यानंतर श्राद्धादी विधी करणे, हे मुलांचे कर्तव्य आहे.
रामायणकाळात श्रीरामाने पिता दशरथाच्या मृत्यूची वार्ता समजल्यानंतर यथाकाली श्राद्ध केले होते, असा उल्लेख आहे.
राजा भगिरथाने पूर्वजांच्या मुक्तीसाठी अनेक वर्षे कठोर तपश्चर्या करून साक्षात गंगा मातेला पृथ्वीवर आणले आणि त्याच्या पूर्वजांना मुक्त केले. अशा प्रकारे कठोर प्रयत्न करण्यालाच ‘भगिरथ’ प्रयत्न असे म्हटले, जाते असे आपण ऐकले असेलच. यावरून श्राद्धविधी किती प्राचीन आहे आणि ब्राह्मणांचे पोट भरण्याचा त्यात काही संबंध नाही, हे लक्षात येते. ‘शिक्षण घेणे हा शिक्षकांचा पोट भरण्याचा धंदा आहे; म्हणून मी पाल्याला शाळेतच घालणार नाही’, असे म्हणणे जेवढे अर्थहीन आहे, तितकेच श्राद्धविधी म्हणजे ब्राह्मणांचा पोट भरण्यासाठी असल्याने आम्ही तो करणार नाही, असे म्हणणे अर्थहीन आहे. ज्याप्रमाणे मुलाने शिक्षण घेतले नाही, तर त्याचीच हानी आहे, त्याप्रमाणे श्राद्धविधी केले नाही, तर त्या कुटुंबाचीच हानी आहे.
श्राद्धादी कुलधर्म पाळल्यावरच वंशशुद्धी होणे : ‘गर्भधारणा झाली की, त्या अर्भकाचा जन्म सुखाने व्हायचा असतो. गर्भातला जिवाचा प्रवेश, त्याची वाढ, गर्भवती मातेची प्रसन्नता आणि सहजसुलभ प्रसुती हे केवळ औषधाने होते का ? त्याकरिता ईश्वरीकृपा हवी असते. विश्व निर्माण करणार्या शक्तीची कृपा हवी. पितर हे वंशरक्षक आहेत; म्हणून शाश्वत असे कुलधर्म, श्राद्धादी धर्म कटाक्षाने सांभाळावे लागतात. कुलधर्म टळले, मातृदोष आणि पितृदोष वाढले, तर त्या कुटुंबाचा विध्वंस होतो. श्राद्धादी कुलधर्म सांभाळले की, वंशशुद्धी अटळ असते. त्याकरिता शाश्वत असे कुलधर्म, श्राद्धादी धर्म पाळले पाहिजेत.
सध्याच्या काळात बहुतेक सर्वच जण पितृदोषाने ग्रस्त : हल्लीच्या काळात पूर्वीप्रमाणे कोणी श्राद्धादी विधी, तसेच साधनाही करीत नसल्याने बहुतेक सर्वांनाच अतृप्त पूर्वजांच्या लिंगदेहांमुळे त्रास होतो. घरात सातत्याने भांडणे होणे, एकमेकांशी न पटणे, नोकरी न मिळणे, घरात पैसा फार काळ न टिकणे, एखाद्याला गंभीर विकार होणे, सर्व परिस्थिती अनुकूल असूनदेखील लग्न न होणे, पती-पत्नीचे न पटणे, गर्भधारणा न होणे, गर्भधारणा झाल्यास गर्भपात होणे, अपत्य जन्माला आल्यास मतीमंद किंवा विकलांग जन्माला येणे, कुटुंबातील एखाद्याला व्यसन लागणे, आदी पितृदोषाची काही लक्षणे आहेत. या लक्षणांचा विचार केला, तर हल्ली जवळपास सर्वांनाच पितृदोषाचा त्रास असल्याचे दिसून येते. त्यामुळे हा त्रास दूर व्हावा किंवा सध्या नसेल, तर भविष्यात उद्भवू नये; म्हणून श्राद्धादी विधी, तसेच ‘श्री गुरुदेव दत्त’, हे नामस्मरण प्रतिदिन करणे आवश्यक आहे. त्यामुळे मर्त्यलोकात अडकलेल्या पूर्वजांना गती मिळते आणि त्यांच्यामुळे होणार्या त्रासांचे निवारण होते.
हिंदु धर्मात सांगितलेले आचार हे अंधश्रद्धा नसून ते शास्त्र आहे. उच्च कोटीचे विज्ञान त्यात सामावले आहे. आज आधुनिक विज्ञान कुठे Multiverse theory विषयी सांगत आहे; पण हिंदु धर्मात कित्येक शतकांपूर्वीच त्याचा उल्लेख आहे. एवढेच नाही, तर अनंत कोटी ब्रह्मांड नायकाचे गुणवर्णन, मनुष्यजन्माचे अंतिम ध्येय, लौकिक आणि पारलौकिक प्रवासात येणारे अडथळे, त्यांच्या निवारणाचे उपाय यांवर सखोल आणि परिपूर्ण मार्गदर्शन केले आहे. त्यामुळे हिंदु तत्त्वज्ञानापुढे आधुनिक विज्ञान हे बालवाडीत असल्याप्रमाणे आहे. ज्याप्रमाणे बालवाडीतील मुलाला पी.एच.डी. करणाऱ्याचा अभ्यासक्रम समजला नाही, तर तो पी.एच.डी. अभ्यासक्रमाचा दोष नसून बालवाडीतील विद्यार्थ्याच्या बुद्धीच्या मर्यादेचा असतो. त्याप्रमाणे आधुनिक विज्ञानाला हिंदु तत्त्वज्ञानपर्यंत पोचता येत नसेल, तर तो धर्माचा दोष नसून आधुनिक विज्ञानाची ती मर्यादा आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. शास्त्रवचन हे शाश्वत आहे. त्यावर श्रद्धा ठेवली, तर मनुष्याचे कल्याण आहे. त्यामुळे श्राद्ध विषयक अपप्रचाराला बळी न पडता प्रत्येकाने यथाशक्ती श्राद्ध करावे, श्री गुरुदेव दत्त असे नामस्मरण करावे आणि साधना करून आत्मकल्याण साधावे.