महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या विरोधामुळे राळेगाव‘मधील (यवतमाळ) मांस दुकाने हटवली

यवतमाळच्या धर्तीवर सरकारने राज्यभरातील सर्वच मंदिरे मद्य-मांस मुक्त करावीत ! – मंदिर महासंघ

      मुंबई / यवतमाळ – महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या पाठपुराव्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव येथील १०० वर्षे जुन्या श्री शीतला माता मंदिर परिसरातील अतिक्रमणे हटवण्यात आली असून मंदिर परिसर मांसमुक्त झाला आहे. या मंदिराच्या भिंतीला खेटून असलेल्या मांस-मटणाच्या दुकानांमुळे भाविकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते, तसेच मंदिराच्या पावित्र्यालाही बाधा पोचत होती. स्थानिक प्रशासनाच्या या कारवाईमुळे मंदिर संस्कृतीला बळ मिळाले आहे. यवतमाळच्या धर्तीवर शासनाने राज्यभरातील सर्वच मंदिरांचा परिसर मद्य-मांस मुक्त करावा, अशी मागणी महासंघाने शासनाकडे केली असून त्यासाठी चालू असलेल्या राज्यव्यापी अभियानाला अजून गती देण्याचा निर्धार केला आहे.

     मंदिरे ही केवळ वास्तू नसून चैतन्याची आणि सात्त्विकतेची केंद्रे आहेत.  महाराष्ट्र ही संतांची भूमी असून  मंदिरे ही श्रद्धास्थाने आहेत. मंदिराच्या परिसरात असणार्‍या मांस, मटण यांच्या दुकानांमुळे मंदिर परिसराचे पावित्र्य भंग होते आणि भाविकांनाही प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागतो. दुर्दैवाने यवतमाळच नव्हे, तर राज्यभरातील अनेक मंदिरांच्या परिसरात मांस, मटण आणि दारूची दुकाने थाटली गेली आहेत. या समस्येचे गांभीर्य ओळखून राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकार्‍यांनी व पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई सुरू करावी, अशी आग्रही मागणी महासंघाने केली आहे.

      मंदिर महासंघाच्या वतीने यापूर्वी जी राज्यव्यापी मंदिर अधिवेशने झाली, त्यांमध्ये ‘मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे यांचा परिसर मद्य-मांसमुक्त करा’, असे ठराव संमत करून शासनाला दिलेले आहेत. त्याची अंमलबजावणी सरकारने तात्काळ करावी. प्रशासनाने वेळीच पावले न उचलल्यास, महासंघ आपले अभियान राज्यभरात अधिक तीव्र करेल, असा स्पष्ट इशारा महासंघाच्या वतीने देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर ज्या भाविकांना आपल्या परिसरातील मंदिराजवळ अशा प्रकारच्या समस्या जाणवत असतील किंवा ज्यांना या ‘मंदिर मद्य मांस मुक्त अभियाना’मध्ये सहभागी व्हायचे असेल, त्यांनी महाराष्ट्र मंदिर महासंघाशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात येत आहे.अशी माहिती श्री. सुनील घनवट यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.