ऐन गणेशोत्सवात श्रीगणेशाचा जाहिरातीसाठी विडंबनात्मक वापर!

ऐन गणेशोत्सवात श्रीगणेशाचा जाहिरातीसाठी विडंबनात्मक वापर !

बिनशर्त माफी मागा अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जा; हवेल्स व न्यूट्रिका कंपन्यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नोटीस.

मुंबई – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हवेल्स इंडिया लिमिटेड आणि न्यूट्रिका (बीएन होल्डिंग्स लिमिटेड) या दोन कंपन्यांनी त्यांच्या जाहिरातींमध्ये भगवान श्रीगणेशाचे विडंबनात्मक आणि अपमानास्पद चित्रण करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. या प्रकारामुळे निर्माण झालेल्या तीव्र संतापाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कायदेशीर नोटीस बजावण्यात आली असून, त्वरित जाहिरात मागे घेऊन बिनशर्त माफीची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा संबंधित कंपन्यांविरोधात गंभीर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा समितीच्या वतीने देण्यात आला आहे.

मुंबईतील प्रभादेवी येथील सेंच्युरी बाजार चौकात हवेल्स कंपनीने लावलेल्या डिजिटल जाहिरातीत भगवान श्रीगणेशाचे शरीर विजेच्या उपकरणांनी बनवलेले दाखवले, तर न्यूट्रिका कंपनीने त्यांच्या खाद्यतेलाच्या कॅनला हात, पाय आणि मुकुट लावून श्रीगणेशाच्या रूपात मांडले. या दोन्ही जाहिरातींमुळे श्रीगणेशाच्या पावित्र्याचा अवमान झाला असून “क्रिएटिव्ह जाहिरात” या नावाखाली श्रद्धेचा उपहास करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. समितीच्या श्री. रविंद्र दासारी आणि श्रीमती स्वाती पांडे यांच्या वतीने अधिवक्ता प्रसाद संकपाळ, अधिवक्ता प्रथमेश गायकवाड व अधिवक्ता सुरभि सावंत यांनी संबंधित कंपन्यांना नोटीस पाठवली आहे.

या प्रकारामुळे केवळ धार्मिक भावना दुखावल्या नसून, भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १५३(अ), १९६, २९९, ३००, ३०२, तसेच भारतीय दंड संहिता (IPC) कलम २९५, २९५(अ), २९८, ग्राहक संरक्षण कायदा २०१९, IT कायदा २०२१, ASCI चा आचारसंहिता, आणि संविधानातील अनुच्छेद २५ व २६ यांचे उल्लंघन झाले आहे. अशा जाहिरातींमुळे समाजात धार्मिक तणाव निर्माण होण्याचा धोका असून, परंपरागत मूर्तीकार, धार्मिक कार्यकर्ते व कोट्यवधी भाविकांच्या श्रद्धेवर घाला घालणारा प्रकार आहे.

हिंदु जनजागृती समिती व तक्रारदारांनी या नोटीसीत मागणी केली आहे की, संबंधित जाहिराती त्वरित मागे घ्याव्यात, सर्वत्र बिनशर्त माफी मागावी, भविष्यात देवतांच्या अशा वापरास प्रतिबंध करणारी लेखी हमी द्यावी आणि मानसिक त्रास व धार्मिक अवमानाच्या भरपाई म्हणून ५० लाखांची रक्कम पाली अष्टविनायक मंदिरास देणगी स्वरूपात अर्पण करावी. या मागण्या मान्य न झाल्यास समिती कायदेशीर मार्गाने लढा देणार आहे.