धक्कादायक! उड्डाणपुलाच्या खोदकामादरम्यान मजुरांना सापडला मानवी सांगाडा

नागपूरात उड्डाण पुलासाठी सुरू असलेल्या खोदकामादरम्यान मानवी सांगाडा सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना सक्कदरा पोलीस स्टेशन हद्दीतील बेसा पावर हाऊसजवळ शुक्रवारी (8 ऑगस्ट) घडली.

खोदकाम करत असताना मजुरांना सांगाडा दिसून आला आणि त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवले. माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि पाहणी केली.

यानंतर फॉरेन्सिक पथकाला बोलावण्यात आले असून, सांगाडा तपासासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे. तो किती जुना आहे, पुरुषाचा की स्त्रीचा आहे, यासह मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी तपास सुरू आहे. सांगाडा आढळल्यानंतर मजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.