खडकवासला प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे यांच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह; मुठा कालवा उपविभागाचा आरोप

पुणे : पुणे शहरासह हवेली, दौंड व इंदापूर तालुक्यातील शेतीसाठी पाणीपुरवठा आणि खडकवासला धरण साखळीची सुरक्षा, देखभाल व नियंत्रणाची जबाबदारी असलेल्या खडकवासला प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे यांच्या कारभारावर गंभीर आरोप झाले आहेत. मुठा कालवा उपविभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कार्यपद्धतीवर अविश्वास व्यक्त करत मुख्य अभियंता हनुमंत धुमाळ यांच्याकडे निवेदन दिले आहे.

निवेदनातील आरोप

निवेदनात म्हटले आहे की, श्वेता कुऱ्हाडे गेल्या दोन वर्षांपासून खडकवासला पाटबंधारे विभागात कार्यरत आहेत. मात्र या काळात त्यांनी वारंवार नियमबाह्य, मनमानी व सूडबुद्धीने निर्णय घेतले, अधिकारी-कर्मचाऱ्यांना वेठीस धरले व विभागातील कामकाज विस्कळीत केले.

निवेदनानुसार त्यांच्यावर लावण्यात आलेले मुख्य आरोप :

  • धरण सुरक्षा संदर्भातील आवश्यक बाबींना प्राधान्य न देणे

  • मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्ती वेळेत पूर्ण न करणे

  • मंजूर कामे सबळ कारणाशिवाय रद्द करणे

  • धरण द्वार संचालनास आवश्यक मनुष्यबळ न पुरवणे, त्यामुळे धरण सुरक्षा धोक्यात आणणे

  • खर्चाचा परतावा न करणे

  • सिंचन व बिगर सिंचन संस्थांना पाणीपुरवठ्यात हलगर्जीपणा करणे

  • अधिकारी व कर्मचाऱ्यांशी सूडबुद्धीने वागून सेवा व वेतनात अडथळे निर्माण करणे

  • पूर व्यवस्थापन व निविदा प्रक्रियांमध्ये अडथळे आणणे

  • धरण व्यवस्थापकांना धमकावणे

या आरोपांसह श्वेता कुऱ्हाडे यांच्या कारभाराची सविस्तर चौकशी करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनावर उपविभागीय अभियंता मोहन बदाणे, गिरीजा कल्याणकर, प्रतिक्षा रावण-मारके, अनुराग मारके यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

या संदर्भात कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला, मात्र प्रतिसाद मिळाला नाही.

उपविभागीय अधिकारी मोहन बदाणे म्हणाले, “श्वेता कुऱ्हाडे यांनी पदाची जाणीव ठेवून निर्णय घेणे अपेक्षित आहे. मात्र त्यांच्या कार्यपद्धतीमुळे प्रकल्पाशी संबंधित गंभीर प्रश्न निर्माण झाले असून पदाचा वापर अधिकाराऐवजी सूड उगविण्यासाठी होत आहे.”