PMC Election : पुणे महापालिकेच्या वॉर्ड रचनेचा प्रारुप आराखडा जाहीर : ४१ प्रभाग, १६५ नगरसेवक, नागरिकांकडून हरकती मागविल्या

पुणे : PMC Election : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. त्यानुसार पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी वॉर्ड रचनेचा प्रारुप आराखडा जाहीर करण्यात आला आहे. या नव्या आराखड्यानुसार पुणे महानगरपालिका क्षेत्रात एकूण ४१ प्रभागांची रचना करण्यात आली असून, यापैकी ४० प्रभाग चार सदस्यीय आणि एक प्रभाग पाच सदस्यीय असेल.

२०११ च्या जनगणनेनुसार पुणे महानगरपालिकेची लोकसंख्या ३४,८१,३५९ इतकी आहे. यापैकी अनुसूचित जातीची लोकसंख्या ४,६८,६३३ तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या ४०,६८७ आहे. या लोकसंख्येनुसार पुणे महापालिकेसाठी १६५ नगरसेवक निवडले जाणार आहेत. विशेष म्हणजे, प्रभाग क्र. ३८ हा पाच सदस्यीय ठेवण्यात आला असून उर्वरित ४० प्रभाग चार सदस्यीय आहेत.

प्रभाग रचनेच्या या प्रारुप आराखड्यावर नागरिकांच्या हरकती व सूचना स्वीकारल्या जाणार आहेत. त्या २२ ऑगस्ट २०२५ ते ३ सप्टेंबर २०२५ या कालावधीत कार्यालयीन वेळेत आणि ४ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत लेखी स्वरूपात देता येतील. यासाठी पुणे मनपा भवनातील स्वागत कक्ष, मनपाची सर्व क्षेत्रीय कार्यालये तसेच निवडणूक कार्यालय (स्वा.वि.दा. सावरकर भवन) येथे सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

इतर महापालिकांची प्रभाग रचना लवकरच

राज्य निवडणूक आयोगाने मुंबई महापालिका तसेच गट अ, ब आणि क वर्गातील महापालिकांची प्रभाग रचना २५ ऑगस्टला जाहीर करणार असल्याचे संकेत दिले होते. मात्र काही महापालिकांचे प्रस्ताव उशिरा प्राप्त झाल्यामुळे प्रभाग रचना सोमवारी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.

आतापर्यंत २९ पैकी १० महापालिकांचे प्रभाग रचना प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाकडे पोहोचले आहेत, तर गट ड मधील महापालिकांचे प्रस्ताव संबंधित महानगरपालिकांकडून हळूहळू मिळत आहेत. मुंबई, नागपूर, पुणे, ठाणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड, छत्रपती संभाजीनगर, वसई-विरार आणि नवी मुंबई या महापालिकांच्या रचना आयोगाकडे प्राप्त झाल्या आहेत. आयोगाकडून सोमवारी या महापालिकांच्या प्रभाग रचना जाहीर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.