सिंहगडावरून गायब झालेला गौतम गायकवाड जिवंत सापडला; अजूनही अनेक प्रश्न अनुत्तरित

पुणे : सिंहगड किल्ल्यावर फिरायला गेलेला आणि गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता असलेला पुण्यातील गौतम गायकवाड अखेर सापडला आहे. तो आजारी अवस्थेत आढळला असून त्याच्यावर तातडीने रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, या संपूर्ण घटनेभोवती अजूनही मोठं कोडं कायम आहे.

२४ वर्षीय गौतम गायकवाड आपल्या मित्रांसोबत सिंहगड किल्ल्यावर गेला होता. तानाजी कडा परिसरात फोटो काढताना तो दरीत कोसळल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर NDRF, अग्निशामक दल, वनविभाग आणि पोलीस यांच्याकडून मोठी शोधमोहीम राबवण्यात आली; परंतु त्याचा काहीच मागमूस लागत नव्हता. कुटुंबीयांवर शोककळा पसरली होती.

दरम्यान, किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या सीसीटीव्हीमध्ये त्याच्यासारखा दिसणारा तरुण दिसल्याने प्रकरण अधिकच गूढ बनले. तो खरंच दरीत पडला होता की मुद्दाम बेपत्ता राहिला होता, असा प्रश्न निर्माण झाला.

चार दिवसांनी तो अचानक सापडला, मात्र तोपर्यंत तो शारीरिकदृष्ट्या थकलेला, अंगावर माराच्या खुणा असलेला आणि थंडीने कापणाऱ्या अवस्थेत होता. सध्या तो बोलण्याच्या स्थितीत नसल्याने नेमके काय घडले याबाबत अजूनही स्पष्टता नाही.

गौतमचा फळांचा व्यवसाय असून त्यात लाखोंची उलाढाल होत होती. त्याच्यावर मोठं कर्ज असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे कर्जामुळेच त्याने अशा प्रकारचा निर्णय घेतला का? या प्रकरणात त्याच्या मित्रांचा सहभाग आहे का? अशा अनेक शंका उपस्थित होत आहेत.

पोलीस सध्या या संपूर्ण घटनेचा तपास करत असून, गौतम रुग्णालयातून परतल्यानंतर त्याच्याकडून चौकशी केली जाणार आहे. त्यानंतरच गेल्या चार दिवसांत तो नेमका कुठे होता आणि बेपत्ता होण्यामागचे खरे कारण काय, हे उघड होईल.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा तरुण नेमका गौतमच होता का, हा संभ्रम अद्याप कायम आहे. मात्र त्याच्या जिवंत सापडण्यामुळे आता पोलिसांच्या तपासातून या रहस्यमय प्रकरणाचा उलगडा होणार, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.