Election : मोठी बातमी, मुंबई पुण्यासह १० महापालिकांची प्रारुप प्रभाग रचना आजच प्रसिद्ध होणार, राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय
मुंबई : राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आता झालेल्या बैठकीत आजच दहा महापालिकांच्या प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हरकती सूचना आणि त्यावरील सुनावणी या सगळ्याला विलंब होऊ नये यासाठी वेळेतच प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाणार आहे.
वर्ग अ ब क अंतर्गत येणाऱ्या
1)मुंबई
2)ठाणे
3)कल्याण डोंबिवली
4)पुणे
5)नागपूर
6)नाशिक
7) पिंपरी चिंचवड
8)छत्रपती संभाजी नगर
9)वसई विरार
10)नवी मुंबई
या दहाच्या दहा महापालिकांचे जी प्रारूप प्रभाग रचना संबंधित महापालिकांकडून प्राप्त झाली आहे, ती तातडीने प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हरकती सूचना आणि त्यावरील सुनावणी पुन्हा नगर विकास विभागाकडे पाठवून राज्य निवडणूक आयोगाकडून अंतिम प्रभाग रचना करण्याच्या वेळापत्रकामध्ये कुठल्याही प्रकारे विलंब होऊ नये. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात प्रभाग रचना अंतिम व्हाव्यात यासाठी राज्य निवडणूक आयोग प्रयत्नशील असल्याची माहिती आहे.
पुण्याची प्रारुप प्रभागरचना जाहीर
आगामी महापालिका निवडणुकीसाठी पुणे महापालिकेकडून प्रारूप प्रभागरचना आराखडा जाहीर करण्यात आला आहे. आगामी महापालिका निवडणुकीसाठी एकूण 41 प्रभाग असणार…यात 40 प्रभाग चार सदस्यीय तर एक प्रभाग पाच सदस्यीय असतील. पुणे महानगरपालिका क्षेत्राची एकुण लोकसंख्या 2011 चे जनगणनेनुसार 34,81,359 इतकी असुन अनुसूचित जातीची लोकसंख्या 4,68,633 इतकी आहे, व अनुसूचित जमातीची लोकसंख्या 40687 इतकी आहे. तसेच निवडून द्यावयाच्या महानगरपालिका सदस्यांची संख्या 165 आहे. एकूण 41 प्रभागांपैकी प्रभाग क्र. 38 हा 5 सदस्यीय असून उर्वरित 40 प्रभाग 4 सदस्यीय आहेत. प्रारूप प्रभाग रचना संदर्भात नागरिकांच्या हरकती/ सूचना दिनांक 22/08/2025 ते दि. 03/09/2025 पर्यंत कार्यालयीन वेळेत व दि. 04/09/2025 रोजी दुपारी 3.00 वाजेपर्यंत पुणे मनपा भवन स्वागत कक्ष, पुणे मनपाची सर्व क्षेत्रीय कार्यालये व निवडणूक कार्यालय, स्वा.वि.दा. सावरकर भवन या ठिकाणी लेखी स्वरुपात स्वीकारण्यात येतील.
पिंपरी चिंचवडची प्रारुप प्रभागरचना जाहीर
पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रक्रियेला अखेर वेग आला आहे. महापालिकेने आज शहरातील 32 प्रभागांची रचना जाहीर केली. चार सदस्यांचा एक प्रभाग असल्यानं एकूण 128 जागांसाठी ही प्रारुप प्रभाग रचना आहे. यावर 4 सप्टेंबर पर्यंत सूचना आणि हरकती नोंदवल्या जाणार आहेत. त्यानंतर 5 ते 12 सप्टेंबर दरम्यान नोंदवलेल्या हरकतींवर सुनावणी पार पडेल. सुनावणी पार पडल्यावर पुढच्या दोन दिवसांत म्हणजे 15 सप्टेंबरपर्यंत पालिका आयुक्त नगरविकास विभागाकडे अंतिम प्रभाग रचना सादर करतील. तिथून पुढं 16 ते 22 सप्टेंबर दरम्यान राज्य निवडणूक आयोगाकडे ही प्रभाग रचना सादर होईल. मग राज्य निवडणूक आयोग या प्रभाग रचनेला अंतिम मान्यता देतील. त्यानंतर 3 ऑक्टोबर ते 6 ऑक्टोंबरच्या दरम्यान पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करतील. त्यावेळी प्रसिद्ध झालेल्या प्रभाग रचनेच्या आधारावर महापालिका निवडणूक पार पडेल.
कल्याण डोंबिवलीची प्रारुप प्रभागरचना जाहीर
कल्याण डोंबिवली महापालिका प्रभाग रचना जाहीर निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. कल्याण डोंबिवली महापालिका एकूण 122 जागा असतील तर 31 प्रभाग असणार आहेत. कल्याण डोंबिवली महापालिका 2025 निवडणूक या वर्षी बहुसदस्यीय प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. 3 सदस्यीय प्रभाग क्रमांक 21 आणि 25 हे आहेत. तर,4 सदस्यीय प्रभाग 29 असतील. कल्याण डोंबिवली महापालिकेची लोकसंख्या 1518762 इतकी आहे. यामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या 150171 तर अनुसूचित जमाती 42584 इतकी आहे.
नाशिक महापालिकेची प्रारुप प्रभागरचना जाहीर
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नाशिक महापालिकेच्या सन 2025 च्या आगामी सार्वत्रिक निवडणूकांसाठी चार सदस्यीय प्रारुप प्रभागरचना जाहीर करण्यात आलीआहे. सन 2011 च्या जनगणना नुसार 122 सदस्य संख्या कायम राहिली असून चार सदस्यीय प्रभाग पध्दत आहे. प्रभागरचनेच्या प्रक्रियेत कुठलाही बदल न झाल्याने 2017 च्या निवडणुकीप्रमाणेच प्रभागरचना ‘जैसे थे’ राहिली आहे.गतप्रभागरचनेप्रमाणेच चार सदस्यीय 29 तर प्रभाग क्र.15 आणि 19 हे तीन सदस्यीय दोन प्रभाग राहणार आहेत.दरम्यान, राज्य शासनाने जारी केलेल्या सुधारीत कार्यक्रमानुसार या प्रभागरचनेवर 4 सप्टेंबरपर्यंत हरकती आणि सूचनासाठी मुदत देण्यात आली आहे