Crime News : हुंड्याच्या ३६ लाखांच्या मागणीसाठी सासरच्यांकडून विवाहितेला जिवंत जाळलं!

ग्रेटर नोएडा : हुंड्याच्या भयानक प्रथेची आणखी एक थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. ग्रेटर नोएडातील सिरसा गावात सासरच्यांनी २६ वर्षीय विवाहितेची निर्घृण हत्या केली. पती आणि कुटुंबीयांनी तिला जिवंत जाळल्याने ती गंभीर भाजली आणि काही तास मृत्यूशी झुंज दिल्यानंतर तिचा दुर्दैवी अंत झाला.

२ गाड्या दिल्या, तरी मागणी थांबली नाही

पीडितेचे नाव निक्की असून तिच्या बहिणी कांचनच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २०१६ मध्ये निक्कीचे लग्न विपिनशी झाले होते. लग्नावेळी कुटुंबीयांनी स्कॉर्पिओसह इतर मौल्यवान वस्तू दिल्या, नंतर आणखी एक गाडी दिली; तरीसुद्धा सासरकडून ३६ लाख रुपयांची मागणी थांबली नाही. उलट निक्कीला रोज मारहाण आणि छळ सहन करावा लागत होता.

पेटवून दिली जिवंत

२१ ऑगस्ट रोजी झालेल्या घटनेत पती विपिनने निक्कीला बेदम मारहाण करून तिच्या मानेवर प्रहार केला. त्यानंतर ज्वलनशील पदार्थ ओतून तिला पेटवून दिले, असा आरोप बहिणीने केला आहे. यावेळी कांचनलाही मारहाण करण्यात आली. घटनेचे काही व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागले असून, त्यात निक्कीवर होणारा छळ स्पष्टपणे दिसतो आहे.

मृत्यूशी झुंज, अखेर दुर्दैवी अंत

गंभीर भाजलेल्या निक्कीला प्रथम फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने तिला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात हलवण्यात येत होते, पण उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाला.

आरोपींवर गुन्हा, पतीला अटक

पोलिसांनी पती विपिन याला अटक केली असून, सासरे सतवीर, सासू दया आणि दीर रोहित यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मात्र हे सर्व आरोपी फरार असून, त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत, अशी माहिती अतिरिक्त डीसीपी सुधीर कुमार यांनी दिली.