मोठी बातमी ! मनसे–शिवसेना (ठाकरे गट) बैठक; युतीच्या चर्चेला वेग

राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विशेष म्हणजे मालेगावमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना (ठाकरे गट) यांची महत्त्वाची बैठक पार पडली असून, दोन्ही पक्ष पहिल्यांदाच एका व्यासपीठावर एकत्र आले आहेत. या बैठकीतून आगामी निवडणुका एकत्र लढविण्याचे संकेत मिळाले आहेत.

याआधी बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत मनसे–शिवसेना (ठाकरे गट) युती पाहायला मिळाली होती. मात्र त्या निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्याने या आघाडीबाबत शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या. तरीसुद्धा नुकत्याच झालेल्या घडामोडींनंतर पुन्हा एकदा या दोन पक्षांच्या एकत्र येण्याची चर्चा रंगली आहे.

त्रिभाषा सूत्राचे दोन्ही जीआर रद्द झाल्यानंतर आयोजित विजयी मेळाव्यात तब्बल वीस वर्षांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू एकाच मंचावर आले होते. त्यानंतर राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना मातोश्रीवर जाऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच गणेशोत्सवाचे निमंत्रणही दिले. त्यामुळे दोन्ही पक्षांमधील जवळीक वाढल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

आता मालेगावमध्ये झालेल्या या बैठकीला मनसे आणि शिवसेना (ठाकरे गट) यांचे स्थानिक नेते व प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या नव्या समीकरणामुळे विशेषतः मालेगाव महापालिकेच्या निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये या घडामोडींमुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.