पुणे | पुणे जिल्ह्यातील अनियंत्रित शहरीकरण, वाढती वाहतूक कोंडी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची मर्यादित क्षमता पाहता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले की, पुणे जिल्ह्यात तीन नव्या महापालिका स्थापन केल्या जाणार आहेत.
अजित पवार यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “कोणाला आवडो किंवा न आवडो, हे महापालिका करूनच दाखवणार!”
त्यांच्या घोषणेनुसार, पुढील तीन भागांत महापालिका स्थापन करण्यात येणार आहेत:
-
चाकण आणि आजूबाजूचा औद्योगिक परिसर
-
हिंजवडी आणि संबंधित आयटी हब परिसर
-
मांजरी, फुरसुंगी आणि उरळी देवाची या भागांचा समावेश असलेली तिसरी महापालिका
या भागांमध्ये अनधिकृत बांधकाम, वाहतूक व्यवस्थेतील बिघाड आणि वाढत्या लोकसंख्येमुळे प्रशासनावर ताण वाढला आहे. स्थानिक ग्रामपंचायती याला पुरेशा नसल्याने महापालिकेचा पर्याय पुढे आणण्यात येत आहे, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
पुणे जिल्ह्यातील चाकण येथे वाहतूक कोंडीची पाहणी करण्यासाठी अजित पवार पहाटे ५.४५ वाजता पोहोचले. या दौऱ्यात त्यांनी तळेगाव ते शिक्रापूर हा मार्ग सहापदरी करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. तसेच पुणे-नाशिक एलिव्हेटेड महामार्ग उभारण्याचाही मानस त्यांनी बोलून दाखवला.
चाकण एमआयडीसीमध्ये १५०० पेक्षा जास्त लघु आणि मध्यम उद्योग असून, त्यामध्ये साडेतीन लाखांहून अधिक कामगार कार्यरत आहेत. परिणामी रोज सुमारे एक लाख वाहने या परिसरात ये-जा करतात. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल करणे अत्यावश्यक आहे, असेही अजित पवार म्हणाले.
या घोषणेमुळे पुणे जिल्ह्याच्या विकासाची दिशा आणि गती दोन्ही बदलण्याची शक्यता असून, स्थानिक नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.