२६ लाख महिलांवर गृहचौकशीचा धोका; लाडकी बहीण योजनेतील गैरवापर उघड

मुंबई : महायुतीसरकारची महत्त्वाकांक्षी आणि लोकप्रिय ठरलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या योजनेतून दरमहा 1500 रुपये मिळवणाऱ्या काही महिलांनी नियमबाह्य लाभ घेतल्याचे उघड झाले असून, तब्बल २६ लाख महिलांच्या घरी गृहचौकशी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

*एका घरात दोनहून अधिक महिलांना लाभ नाही*

या योजनेनुसार, एका घरात फक्त दोन महिलांनाच लाभ घेता येतो, मात्र अनेक घरांतील दोनपेक्षा अधिक महिलांनी लाभ घेतल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे महिला व बालकल्याण विभागाने २६ लाख महिलांची यादी तयार केली असून त्यांच्यावर विभागनिहाय चौकशी सुरू करण्यात आली आहे. चौकशीत अपात्र ठरलेल्या महिलांचा लाभ थांबवला जाणार आहे.

*सध्या 2.29 कोटी महिलांना लाभ*

सध्या राज्यातील २ कोटी २९ लाख महिलांना या योजनेचा लाभ दिला जात आहे. मात्र, चौकशीनंतर हा आकडा कमी होण्याची शक्यता आहे. याआधीही २६ लाख ३४ हजार महिलांना अपात्र ठरवण्यात आले होते, ज्यामुळे अनेक लाभार्थी महिलांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले होते.

*रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा दिलासा*

नाराज लाभार्थींना समजावत, रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने मोठा दिलासा दिला आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली की, ६ ऑगस्टपासून लाभार्थी महिलांच्या बँक खात्यांत जुलै महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता जमा केला जात आहे. उर्वरित पात्र महिलांनाही पुढील दोन दिवसांत रक्कम जमा होईल.

*राजकीय परीघात योजनेचा प्रभाव*

ही योजना 2024 च्या निवडणुकीत महायुतीच्या विजयात निर्णायक ठरल्याचे बोलले जाते. मात्र, योजनेतील गैरवापर आणि अपात्र लाभार्थ्यांमुळे आता शासनासमोर विश्वसनीयता आणि पारदर्शकतेचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.