मालेगाव, ७/११ व दाभोलकर प्रकरणांतील राजकीय हस्तक्षेप मीरा बोरवणकर यांनी जाहीर करावा !
– सनातन संस्थेचे आवाहन
मालेगाव बाँबस्फोट, मुंबईतील ७/११ चा रेल्वे बॉबस्फोट आणि दाभोलकर हत्या या प्रकरणांचे नुकतेच निकाल लागले. या प्रकरणांमध्ये ‘राजकीय हस्तक्षेप’ होता, असा सनसनाटी निर्माण करणारा आरोप माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी केला. आम्ही त्यांना विनंती करतो की, त्यांनी राजकीय हस्तक्षेप करणार्या ‘त्या’ राजकीय नेत्यांची नावे जाहीर करावीत, असे आवाहन सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी केले आहे.
ते कोल्हापूर येथील प्रेसक्लब येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी महाराष्ट्र मंदिर महासंघाचे करवीर तालुका संयोजक श्री. अशोक गुरव, हिंदु एकता आंदोलनाचे जिल्हाप्रमुख श्री. दीपक देसाई, सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिंदे, महाराजा प्रतिष्ठानचे संस्थापक श्री. निरंजन शिंदे आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी हे उपस्थित होते.
श्री. राजहंस पुढे म्हणाले की, या घटना ज्या काळात घडल्या, त्या वेळी महाराष्ट्रात काँग्रेसचे सरकार होते. दाभोलकर प्रकरणात काँग्रेसचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हत्येच्या घटनेनंतर तपास चालू होण्यापूर्वीच ‘ही हत्या गोडसेवादी प्रवृत्तींनी केली’, असे म्हणत तपासाला दिशा दिली, हा राजकीय हस्तक्षेप होता, असे मीरा बोरावणकर यांना म्हणायचे होते का? एटीएस् प्रमुख हेमंत करकरे यांच्यावरही राजकीय दबाव होता, असे त्या म्हणाल्या, त्यातून तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, गृहमंत्री आर्.आर्. पाटील कि केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी हस्तक्षेप केला, असे बोरवणकर यांना म्हणायचे आहे, हे त्यांनी स्पष्ट करावे.
पुणे येथे दाभोलकरांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने झालेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (‘अंनिस’च्या) कार्यक्रमात मीरा बोरवणकर म्हणाल्या की, खाकीने हिरवे, भगवे वा पांढरे होणे, हे अत्यंत घातक आहे. आम्ही त्यांना सांगू इच्छितो की, खाकीने डावे आणि उजवेही असता कामा नये. ज्या संघटनेचे कार्यकर्ते नक्षलवादी म्हणून अटक होत आहेत, ज्या संघटनेचे नाव काँग्रेसच्या काळात आर्.आर्. पाटील हे गृहमंत्री असतांना महाराष्ट्र गुप्तवार्ता विभागाच्या ‘नक्षलवाद्यांना साहाय्य करणार्या संघटनांच्या’ यादीत आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी राहिलेल्या बोरवणकर यांना हे माहिती नव्हते का ? नुकताच प्रशांत कांबळे उर्फ सुनील जगताप या कट्टर नक्षलवाद्याला रायगडमध्ये अटक झाली. तो अंनिसचे कार्यकर्ता आहे. हे बोरवणकर यांना माहिती नाही का ? स्वतःला विवेकाचा आवाज म्हणवणार्या अंनिसबद्दल आम्ही नव्हे, तर सातारा येथील साहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी कडक ताशेरे ओढत यांच्या ट्रस्टवर प्रशासक नेमण्याची, तसेच विशेष लेखापरिक्षण करण्याची शिफारस केली आहे, हे त्यांना माहित नाही का ?
अशा संघटनेच्या व्यासपीठावर जाणे योग्य कि अयोग्य, हे कोणालाही वाटू शकते; पण याविषयीही ‘या कार्यक्रमासाठी जाऊ नये’, म्हणून मीरा बोरवणकर यांना २० फोन आले म्हणे, त्यात एक धमकीचा फोनही आला, असे त्या म्हणाल्या. माजी पोलीस आयुक्तांना धमकी आली, इतकी गंभीर घटना घडूनही एक साधी बातमी आली नाही. बोरवणकर यांनी याविषयी पोलीस तक्रार केली आहे ना? दाभोलकर प्रकरणातही हमीद दाभोलकर यांनी माझ्या वडिलांना ‘तुमचा गांधी करू’, अशी धमकी आल्याचा सनसनाटी आरोप करून वारेमाप प्रसिद्धी मिळवली होती. प्रत्यक्षात न्यायालयात याविषयी विचारणा केल्यावर त्यांना काहीच सांगता आले नाही, त्याविषयी साधी पोलीस तक्रारही केलेली नाही, हे समोर आले. यातून जनतेने काय ते समजून घ्यावे, असे श्री. राजहंस म्हणाले.