शिवाजी महाराजांना ‘सेक्युलर’ ठरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ‘खालिद का शिवाजी’ चित्रपटावर बंदी घाला !

हिंदु राष्ट्र समन्वय समितीची आंदोलनाद्वारे मागणी ! 

पुणे – ‘खालिद का शिवाजी’ या आगामी मराठी चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांविषयी ऐतिहासिकदृष्ट्या खोटी, तथ्यहीन व विकृत माहिती देऊन समस्त जनतेची दिशाभूल केली आहे. या विकृत प्रचारामुळे समस्त शिवप्रेमींच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. या चित्रपटात शिवाजी महाराजांच्या सैन्यात 35% मुस्लिम सैनिक होते, महाराजांचे 11 अंगरक्षक मुस्लिम होते, आणि रायगडावर महाराजांनी मशिद बांधली होती, असे आक्षेपार्ह व विकृत दावे करण्यात आले आहेत. हे सर्व दावे भ्रामक, अप्रामाणिक व कोणत्याही ऐतिहासिक पुराव्याविना प्रसारित करण्यात आले आहेत. त्यामुळे ‘‘खालिद का शिवाजी’’ या चित्रपटावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या माध्यमातून करण्यात आलेल्या आंदोलनात करण्यात आली. हे आंदोलन झाशीच्या राणीच्या पुतळ्याजवळ, बालगंधर्व चौक, जंगली महाराज रस्ता, पुणे येथे 7 ऑगस्ट या दिवशी सायंकाळी 5.30 ते 7 या दरम्यान करण्यात आले. या ठिकाणी झालेल्या आंदोलनात लेखक आणि इतिहास अभ्यासक श्री. सौरभ कर्डे, भाजप महिला मोर्चा पुणे शहराच्या सरचिटणीस सौ. उज्ज्वला गौड, श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे पुणे जिल्हा प्रमुख श्री. मुकुंद मासाळ, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे पुणे जिल्हा समन्वयक ह.भ.प. दत्तात्रय चोरघे महाराज, श्री.संजय पांडे, अधिवक्ता श्री. विवेक भोसले, राष्ट्रीय वारकरी परिषद,राज्य प्रवक्ता तथा संघटक ह.भ.प. महेंद्र महाराज म्हस्के, स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंचाचे अध्यक्ष डॉ. श्री. नीलेश लोणकर, अधिवक्ता नीलेश निढाळकर, अधिवक्ता अर्चना मारणे आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले आदी मान्यवरांसह बहुसंख्येने शिवप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.
    या चित्रपटात शिवाजी महाराजांना ‘सेक्युलर’ ठरवण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न इतिहासाच्या नावाने समाजात गोंधळ निर्माण करणारा आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमधेच इतके दोष असतील तर संपूर्ण चित्रपट हा समाजाची वैचारिक दिशाभूल करणारा असेल, नवीन पिढ्यांमध्ये इतिहासाबद्दल गैरसमज निर्माण करील. शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यासाठी खरे योगदान आणि बलिदान देणाऱ्या मावळ्यांचे श्रेय दुसऱ्याच कुणाला तरी देण्याचा हा विश्वासघातकी प्रयत्न आहे असे मत समितीने मांडले आहे.
     यावेळी, छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदू राजे होते, आणि त्यांचे विकृतीकरण हे धर्मभ्रष्ट करण्याचे षडयंत्र आहे असे अधिवक्ता निलेश निढाळकर यांनी सांगितले. ‘हा चित्रपट फक्त एका संघटनेचा नव्हे, तर पूर्ण हिंदू समाजाचा अपमान आहे. आजच्या पिढीवर या चित्रपटाचा विपरित परिणाम होणार असल्याने यावर त्वरित बंदी घालावी’, असे आवाहन ‘श्री शिव शंभु विचार मंच’ संघटनेचे राज्य संयोजक श्री. सुधीर थोरात यांनी केले. ‘आम्ही शांत आहोत म्हणजे षंढ नाही; आमच्याकडे सत्य आणि धर्माची बाजू आहे’ असे परखड प्रतिपादन राष्ट्रीय वारकरी परिषदेचे राज्य प्रवक्ता तथा संघटक ह.भ.प. महेंद्र महाराज म्हस्के यांनी केले. उज्वला गौड यांनी सांगितले की, हिंदूंची मने दुखण्याची हिंमत करणाऱ्याला शिक्षा झालीच पाहिजे. याचप्रमाणे अन्य मान्यवरांनीही उपस्थितांना संबोधित केले.
                                         
    ‘खालिद का शिवाजी’ या चित्रपटावर जोपर्यंत त्यातील ऐतिहासिक माहितीचे अधिकृत सत्यापन होत नाही तोपर्यंत बंदी घालण्यात यावी, अशी मागणी हिंदु राष्ट्र समन्वय समितीने केली आहे.