चाललंय काय? विद्यापीठातील रिफेक्टरीमध्ये अळी सापडल्याने संताप : विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ (Video)

पुणे – विद्यापीठाच्या रिफेक्टरीमध्ये विद्यार्थिनीच्या जेवणाच्या ताटात अळी सापडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या प्रश्नावर गंभीर चिंता व्यक्त होत आहे. संबंधित विद्यार्थिनीने ही तक्रार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पिंपरी-चिंचवड शहर यांच्याकडे केल्यानंतर, युवक शहराध्यक्ष डॉ. धम्मरत्न गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने विद्यापीठाचे कुलगुरू यांची भेट घेऊन तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी करत लेखी निवेदन सादर केले.

या निवेदनात, रिफेक्टरी व मेस यामधील टेंडर प्रक्रियेमध्ये पारदर्शकता ठेवावी, सर्व प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पार पाडाव्यात, तसेच अनावश्यक मुदतवाढ टाळावी, अशी ठाम भूमिका मांडण्यात आली.

“विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही,” असे सांगत डॉ. गायकवाड यांनी संबंधित अधिकाऱ्यांनी व्यवस्थापनाशी संगनमत करून दुर्लक्ष केल्यास, त्यांच्यावरही कठोर शिस्तभंगात्मक कारवाई व्हावी, अशी मागणी यावेळी केली.

या निवेदन प्रसंगी उपस्थित असलेले अन्य महत्त्वाचे प्रतिनिधी:

  • राहुल ससाणे – अध्यक्ष, विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती

  • कृष्णाजी भांडलकर – सिनेट सदस्य (राज्यपाल नियुक्त)

  • रोहित भामरे – विद्यार्थी, मराठी विभाग

  • अभिषेक शेलार – विद्यार्थी

  • यश सुरते – विद्यार्थी

डॉ. गायकवाड यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांचे आरोग्य, सुरक्षितता आणि शिक्षणाचा दर्जा यासाठी आमचा पक्ष सदैव सजग असून, पारदर्शक आणि जबाबदार व्यवस्थापनासाठी आम्ही लढा सुरूच ठेवणार आहोत.”

विद्यापीठ प्रशासनाने या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन रिफेक्टरीची पाहणी करावी, दोषींवर कारवाई करावी आणि अशा घटना पुन्हा होणार नाहीत याची शाश्वती द्यावी, अशी विद्यार्थ्यांची ठाम मागणी आहे.