Pune slab collapse kills one and leaves three seriously injured | पुण्यात स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू, तर तीन गंभीर जखमी

Pune slab collapse kills one and leaves three seriously injured

कॅम्प परिसरातील साचापीर स्ट्रीट येथे मंगळवारी दुपारी एक भीषण दुर्घटना घडली. ओयसिस हॉटेल शेजारील बिल्डिंग क्रमांक ४९५/४९६ मध्ये सुरु असलेल्या बांधकामादरम्यान चौथ्या मजल्यावरील जिन्याचा स्लॅब कोसळून एक कामगार ठार, तर दोन कामगार गंभीर जखमी झाले आहेत.

ही दुर्घटना मंगळवारी दुपारी सुमारे १२.३० वाजता घडली. स्थानिक पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बांधकामस्थळी कामगार जिन्याचे काम करत असताना अचानक स्लॅब तुटून कोसळला. तीन कामगार त्यात अडकले. एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर इतर दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच पुणे कॅन्टोन्मेंट पोलिस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले व बचावकार्य हाती घेण्यात आले. या घटनेनंतर संबंधित बिल्डर आणि ठेकेदाराची चौकशी सुरू करण्यात आली असून कामात निष्काळजीपणा झाला का? याचा तपास सुरू आहे.

घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले असून स्थानिक नागरिकांनी बांधकाम क्षेत्रातील सुरक्षाविषयक उपाययोजना आणि नियंत्रणाची मागणी केली आहे.
प्रशासन आणि पोलिसांकडून दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा उपायांची अंमलबजावणी झाली होती का?, याचा शोध घेतला जात आहे.