Pune Crime News : वाहनांच्या तोडफोडीच्या ४० घटना; रात्रीचे भाई सकाळी गुडघ्यावर
दहशत, पूर्ववैमनस्य किंवा किरकोळ कारणांमुळे वाहनांची तोडफोड करण्याच्या तब्बल ४० घटना यंदा पाच महिन्यात घडल्या आहेत. जुने वाद, गल्लीतील डॉन, भाई, परिसरातील दादा होण्याचा मोह, तसेच भागातील भाई, दादा मीच, यासाठी सांस्कृतिक व शांतताप्रिय शहरात वाहनांची तोडफोड होत असल्याचे भयावह वास्तव आहे. वाहन तोडफोड प्रकरणात अल्पवयीन मुलांचा सहभाग चिंताजनक आहे. चालू वर्षात (३१ मेपर्यंत) तब्बल ४० घटना घडल्या असून, केवळ ७२ जणांना अटक करण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. विशेष म्हणजे, यामध्ये ४० मुले अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे.
पुणे शहरात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या टोळक्याकडून दहशतीसाठी, तसेच पूर्ववैमनस्यातून वाहन तोडफोड सत्र कायम असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. सिंहगड रोडवरील वडगाव कॅनाल रोडवरील गोयलगंगा परिसर आणि सिंहगड पुलाखालील परिसरात दुचाकीवर आलेल्या सहा जणांच्या टोळक्याने वाहनांची तोडफोड केली. शहरातील स्ट्रीट क्राईम वाढत असताना वाहन तोडफोड, तसेच जाळपोळ प्रकरण मोठ्या प्रमाणात घडू लागली आहेत. पुणेकरांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या घटनांमुळे पुण्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.
घरफोड्या, लूटमार, तसेच वाहनचोर आणि चैन स्नॅचिंग यामुळे पुणेकर दहशतीत आहेत. त्यात वाहन तोडफोडीमुळे आणखीनच भीतीचे वातावरण पसरले आहे. पुणे पोलिसांना या टवाळखोर तरुणांचा बंदोबस्त करण्यात अपयश येत असल्याचे दिसत आहे. टोळके अचानक येऊन वाहन तोडफोड करत असल्याने पोलिसांची कमी आणि गुन्हेगार टोळक्यांचीच दहशत वाढत असल्याचे वास्तव आहे.
पुणे पोलीस वाहन तोडफोड, तसेच रस्त्यात दहशत माजविणाऱ्या टोळक्याची भररस्त्यात धिंड काढत आहेत. यामुळे आरोपींच्या परिसरातील भाईगिरीला लगाम लागत असला तरी शहरातील विविध भागात तोडफोडीचे सत्र कायम आहे. टोळक्याची गुडघ्यावर परिसरातून वरात काढल्यानंतरदेखील या टोळक्याकडून वाहन तोडफोड आणि जाळपोळ सुरूच असल्याचे दिसत आहे.
वारजे, येरवडा, सिंहगड, हडपसर, चतु:श्रुंगी तसेच वानवडी, कोंढवा, चंदननगर या भागात अशा टवाळखोरांकडून सातत्याने वाहन तोडफोड होत आहे. त्यांची भाईगिरी पोलिसांकडून लागलीच सकाळी बाहेर काढली जात आहे. असे असूनदेखील त्यांची गुन्हेगारी प्रवृत्ती कमी होत नसल्याचे दिसत आहे.
अशा वाहन तोडफोडीच्या घटनांमागे सामाजिक आणि राजकीय कारणे असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. काही घटनांमध्ये वैयक्तिक वाद, काही ठिकाणी टोळीयुद्ध, तर काही वेळा राजकीय भांडणांमुळे सार्वजनिक शांतता भंग झाल्याचे आढळले. याशिवाय सोशल मीडियावरून निर्माण झालेले वाद हेदेखील प्रत्यक्ष हिंसाचारात रूपांतरित झाले आहेत.
वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करुन गोंधळ घालणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात येणार आहे. अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्यांविरोधात पुणे पोलिसांनी विशेष मोहीम सुरु केली असून गुन्हेगारांवर योग्य ती कारवाई केली जाईल. आरोपींचे रेकॉर्ड पाहून त्यांच्यावर एनपीडीए अंतर्गत कारवाई प्रस्तावित आहे. गाडी जाळण्याचे जे हॉटस्पॉट आहेत, त्यातील आरोपींची ओळख पटवून आणि रस्त्यावर धुमाकूळ घालणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी युद्ध पातळीवर विशेष मोहीम राबविली जात आहे. – अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे