Pune Crime : पुण्यात भरपावसात विवाहित महिलेवर अत्याचार; नवऱ्याने घेतला संशय, घराबाहेर काढले

Pune Crime : पुण्यात भरपावसात विवाहित महिलेवर अत्याचार; नवऱ्याने घेतला संशय, घराबाहेर काढले

पुणे : शहराच्या उपनगरात भरपावसात घडलेली एका विवाहितेवरील अत्याचाराची घटना समोर येताच सर्वत्र खळबळ उडाली आहे. पवना धरण परिसरात ही धक्कादायक घटना घडली असून, लोणावळा ग्रामीण पोलीस तपास करत आहेत.

पीडित महिला कातकरी समाजातील असून ती एका डोंगराळ भागात राहते. १६ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास पावसात छत्री घेऊन एकटी चालत असताना एका अज्ञात दुचाकीस्वाराने तिचा पाठलाग केला. काही अंतर गेल्यावर त्याने दुचाकी तिच्या समोर अडवली आणि जवळच्याच शेतामधील झुडपात जबरदस्तीने ओढत नेत तिच्यावर अत्याचार केला. आरोपीने नंतर घटनास्थळी तिला तशाच अवस्थेत सोडून पळ काढला.

महिलेने आरडाओरडा केला, मात्र पावसामुळे रस्त्यावर कोणीच नव्हते, त्यामुळे तिला कोणतीही मदत मिळाली नाही. घडलेला प्रकार तिने घरी परत जाऊन पतीला सांगितला, परंतु पतीने तिच्यावरच चारित्र्याचा संशय घेत तिला घराबाहेर काढले.

नाइलाजाने ती आपल्या मायके घरी गेली आणि घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर तिने लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गंभीर दखल घेत तातडीने गुन्हा दाखल केला आणि तपासाला सुरुवात केली.

सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीचा शोध घेण्यात आला आणि केवळ आठ तासांच्या आत आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले. अटकेत असलेल्या आरोपीचे नाव बाळू दत्तु शिर्के (रा. जीवन नं. ०१, ता. मावळ, जि. पुणे) असे आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, पोलिसांनी पीडितेच्या पतीवरही चारित्र्यावर संशय घेऊन मानसिक त्रास दिल्याप्रकरणी स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे.