Pune Baramati Accident | बारामतीच्या महात्मा फुले चौकात रविवारी एक हृदयद्रावक घटना घडली. डंपर आणि दुचाकीच्या भीषण अपघातात वडील आणि दोन मुलींचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण बारामती शोकसागरात बुडाली आहे.
मृतांमध्ये ४ वर्षांची मधुरा ओंकार आचार्य, १० वर्षांची सई ओंकार आचार्य आणि त्यांचे वडील ओंकार आचार्य यांचा समावेश आहे. हे तिघेही डंपरच्या चाकाखाली चिरडले गेले. ओंकार आचार्य मूळचे इंदापूर तालुक्यातील सणसर येथील असून, सध्या बारामतीत मोरगाव रोडवर वास्तव्यास होते.
हा अपघात इतका भयावह होता की, ओंकार आचार्य यांचे शरीर पोटापासून खाली पूर्णपणे चिरडले गेले होते. तरीही ते दोन हातांवर जोर देत उठण्याचा प्रयत्न करत होते आणि हतबल अवस्थेत म्हणत होते, “माझ्या मुलींना वाचवा!”
मृत्यूच्या दारात उभा असलेला बाप आपल्या मुलींसाठी शेवटचा श्वास घेईपर्यंत लढत होता, हे दृश्य अनेकांच्या डोळ्यात पाणी आणणारे ठरलं.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त करत म्हटलं, “दुचाकी व डंपरच्या अपघातात दोन चिमुकल्या मुली आणि त्यांचे वडील मृत्युमुखी पडले, ही घटना अत्यंत वेदनादायक आहे. मी सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे.”
खासदार सुनेत्रा पवार यांनी देखील ट्विट करत भावना व्यक्त केल्या, “महात्मा फुले चौकात घडलेल्या भीषण अपघातात निष्पाप जीवांचे निधन झाले. हे अतिशय हृदयद्रावक आहे. मी कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करते.”
निष्काळजीपणा की दुर्लक्ष?
घटनास्थळी झालेल्या प्राथमिक चौकशीनुसार, अपघात अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी घडला असून वाहतुकीबाबत असलेली बेफिकिरी आणि डंपर चालकाचा निष्काळजीपणा हाच मुख्य कारण ठरतो आहे. या अपघातात तीन निष्पाप जीवांचे बलिदान वाया जाऊ नये, यासाठी स्थानिक प्रशासनाने वाहतूक व्यवस्थापन आणि नियम कठोर करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.