Pranjal Khewalkar Case: पुण्यातील खराडी इथं कथित रेव्ह पार्टी प्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं दोन महिलां आणि ५ पुरुषांना रविवारी पहाटे अटक केली. या प्रकरणात राज्याचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांनाही अटक झाली आहे.
अटक केलेल्या सगळ्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. अटकेआधी त्यांची वैद्यकीय तपासणी ससून रुग्णालयात करण्यात आली होती. त्यानंतर रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते.
प्रांजल खेवलकर यांच्यासह सात जण खराडीतील हॉटेल स्टे बर्डमध्ये एका रूममध्ये पार्टी करत होते. या पार्टीत अंमली पदार्थांचे सेवन केलं जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलिसांनी छापा टाकला होता. छाप्यात कोकेनसदृश्य पदार्थ आणि गांजा मिळाल्याचं पोलिसांनी सांगितलंय.
आता आरोपींच्या रक्ताच्या नमुन्यांचा तपासणी अहवाल समोर आला आहे. पोलिसांना ससून रुग्णालयाकडून अहवाल प्राप्त झाले आहेत. यामध्ये एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांनी दारुचे सेवन केल्याचं आढळून आलं आहे. प्रांजल खेवलकर आणि श्रीपाद यादव यांनी दारू प्यायलं हे स्पष्ट झालं आहे. ससून रुग्णालयाच्या प्राथमिक अहवालातून माहिती समोर आलीय. तर ड्रग्सचे सेवन केलं होतं का नाही हे एफएसएल अहवाल आल्यावर स्पष्ट होणार आहे. दरम्यान, प्रांजल खेवलकर यांनी ड्रग्जचं सेवन केलं नाही असं त्यांच्या वकिलांनी न्यायालयात सांगितलं होतं.
खराडीत अटक केलेल्या आरोपींच्या वकिलांनी पोलिसांनी केलेले आरोप फेटाळून लावलेत. पार्टीत कोणत्याही प्रकारचे अंमली पदार्थांचे सेवन केले नव्हते. हे षडयंत्र असून अडकवण्याचा प्रयत्न असल्याचा दावा प्रांजल खेवलकर यांच्या नातेवाईकांनी केलाय. एकनाथ खडसे यांनीही या प्रकरणात प्रांजल यांना गोवण्याचा प्रयत्न झाल्याचं म्हटलंय.