Bullet Train Status : कधी सुरु होईल मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन? केंद्र सरकारने संसदेत दिली महत्त्वाची माहिती…

Bullet Train Status : मुंबई-अहमदाबाद हायस्पीड बुलेट ट्रेनसंदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. सध्या या प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू असून, याच्या पूर्णत्वाची प्रतिक्षा देशवासीयांना लागली आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने संसदेत या प्रकल्पासंबंधित काही महत्त्वाची माहिती दिली आहे.

वापी ते साबरमती मार्ग डिसेंबर २०२७ पर्यंत तयार होणार : केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत लेखी उत्तराद्वारे सांगितले की, मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे (MAHSR) प्रकल्पातील गुजरातमधील वापी ते साबरमती दरम्यानचा टप्पा डिसेंबर २०२७ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. तर संपूर्ण प्रकल्प – म्हणजेच महाराष्ट्र ते साबरमती मार्ग – डिसेंबर २०२९ पर्यंत पूर्ण होण्याचे उद्दिष्ट आहे.

५०८ किमी लांबीचा हायस्पीड मार्ग : या बुलेट ट्रेन मार्गाची एकूण लांबी ५०८ किलोमीटर असून, यात गुजरात, महाराष्ट्र आणि दादरा-नगर हवेलीचा समावेश आहे. या मार्गावर एकूण १२ स्थानके असतील: मुंबई, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलिमोरा, सूरत, भरूच, वडोदरा, आणंद, अहमदाबाद आणि साबरमती.

गुजरातमधील आठ महत्त्वाची स्थानके : गुजरातमध्ये वापी, बिलिमोरा, सूरत, भरूच, वडोदरा, आणंद, अहमदाबाद आणि साबरमती ही आठ प्रमुख ठिकाणे बुलेट ट्रेन मार्गावर असणार आहेत.

प्रकल्प खर्च आणि आर्थिक भागीदारी : बुलेट ट्रेन प्रकल्पाचा एकूण खर्च सुमारे ₹१.०८ लाख कोटी रुपये इतका असून, यापैकी सुमारे ८८ हजार कोटी रुपये (८१%) जपान सरकारकडून आर्थिक साहाय्याच्या स्वरूपात दिले जात आहेत. उर्वरित २० हजार कोटींपैकी ५०% रक्कम रेल्वे मंत्रालय, तर २५% महाराष्ट्र सरकार आणि २५% गुजरात सरकारकडून दिली जाणार आहे.

मोदी सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प : हा बुलेट ट्रेन प्रकल्प मोदी सरकारचा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते अहमदाबाद दरम्यानचा प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे आणि देशात आधुनिक वाहतुकीच्या नव्या युगाची सुरुवात होणार आहे.