अल्पवयीन मुलीवर धावत्या रेल्वेत लैंगिक अत्याचार, टॉयलेटमध्ये नेऊन सैतानानं लचके तोडले!

धावत्या रेल्वेत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची एक संतापजनक घटना समोर आली आहे. कल्याणमध्ये एका १६ वर्षीय मुलीला फूस लावून एका नराधमाने मेल एक्सप्रेसमध्ये तिच्यावर अत्याचार केले. धक्कादायक बाब म्हणजे, अत्याचारानंतर आरोपीने मुलीला आपल्या घरीही नेले होते, मात्र कुटुंबीयांनी विरोध केल्याने त्याने मुलीला अकोला रेल्वे स्थानकावर सोडून पळ काढला.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी गजानन चव्हाण याने २९ जून रोजी कल्याण रेल्वे स्थानकावर पीडित मुलीशी मैत्री केली. कल्याण पश्चिमेकडून पूर्वेकडे पादचारी पुलावरून जात असताना तो तिला भेटला. त्याने तिच्याशी ओळख वाढवत गप्पा मारल्या आणि जवळीक निर्माण केली. त्यानंतर त्याने तिला कल्याण स्थानकातून अकोल्याला जाणाऱ्या मेल एक्स्प्रेसमध्ये बसवले. प्रवासादरम्यान, इगतपुरी ते अकोल्यादरम्यान धावत्या एक्सप्रेसच्या शौचालयात त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

अत्याचारानंतर आरोपीने पीडित मुलीला अकोला जिल्ह्यातील त्याच्या घरी नेले. परंतु, त्याच्या कुटुंबीयांनी मुलीला स्वीकारण्यास नकार देत तिला घरी परत सोडण्यास सांगितले. यानंतर आरोपीने तिला कल्याणला परत न सोडता अकोला रेल्वे स्थानकावरच सोडून पळ काढला.

या घटनेनंतर अकोला पोलिसांनी तात्काळ अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आणि पुढील तपासासाठी हा गुन्हा कल्याण लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग केला. कल्याण लोहमार्ग पोलिसांनी वेगाने तपास करत आरोपी गजानन चव्हाणला अकोल्यातून अटक केली आणि त्याला कल्याणमध्ये आणले. आरोपीला कल्याण रेल्वे न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला १५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

या धक्कादायक घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. अल्पवयीन मुलीची फसवणूक करून धावत्या रेल्वेत केलेल्या या लैंगिक अत्याचाराबद्दल आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.