Manchar Accident : पिकअप टेम्पोची एस.टी. बसला मागून जोराची धडक; दोन जण गंभीर जखमी

Manchar Accident : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील एकलहरे (ता. आंबेगाव) येथे बुधवारी सकाळी ९ वाजता भरधाव पिकअप टेम्पोने समोर चाललेल्या एसटी बसला मागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात पिकअपमधील दोन जण गंभीर जखमी झाले.

मंचरहून नारायणगावच्या दिशेने जात असलेल्या एसटी बस (क्रमांक एमएच-१४ बीटी-४९९९) ने एकलहरे येथे गतीरोधक दिसताच अचानक ब्रेक मारला. याचवेळी मागून भरधाव वेगात येणाऱ्या पिकअप टेम्पोने (क्रमांक एमएच-०६ एजी-४३७७) बसला जोरात धडक दिली.

या अपघातात पिकअप चालक संदेश गुप्ता (२२, रा. शिनोली, ता. आंबेगाव) व त्याचा सहकारी तुषार साबळे (२०, रा. फुलवडे, ता. आंबेगाव) हे दोघे गंभीर जखमी झाले. गुप्ता यांच्या दोन्ही पायांना आणि डोक्याला मोठ्या जखमा झाल्या आहेत. दोघांनाही मंचर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनास्थळी उपस्थित प्रवाशांनी प्रसंगावधान राखत पहारीच्या मदतीने पिकअपमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढले. एसटीचे चालक संतोष गायकवाड (रा. करुळे, ता. संगमनेर) आणि वाहक अमोल चव्हाण (रा. राक्षेवाडी, ता. खेड) हे दोघेही सुखरूप आहेत.

अपघाताची माहिती मिळताच मंचर एसटी आगाराचे अधिकारी पांडुरंग मूठे, बस स्थानक प्रमुख साधना कालेकर आणि मोहम्मद सय्यद यांनी घटनास्थळी भेट दिली. मंचर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि वाहने रस्त्याच्या कडेला हलवून वाहतुकीला सुरळीत केले.

या ठिकाणी अपघात ही नवीन गोष्ट नाही. १७ जून रोजी याच ठिकाणी पडवळ कुटुंबातील दोन सदस्यांचा मृत्यू झाला होता, त्यानंतर स्थानिकांनी बाबाजी चासकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केलं होतं. खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्तक्षेपानंतर आंदोलन मागे घेण्यात आले होते. त्यानंतर प्रशासनाने काही तात्पुरत्या उपाययोजना केल्या होत्या.

वाहनचालकांच्या मते, गतीरोधक अचानक समोर आल्याने आणि चेतावणी फलक नसल्यानं अपघात वाढत आहेत. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने गतीरोधकापूर्वी ३०० मीटर अंतरावर “पुढे गतीरोधक आहे, वाहने सावकाश चालवा” अशा सूचना फलकांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

“कळंब गावाकडे जाण्यासाठी एकलहरे चौकात भुयारी मार्ग लवकर पूर्ण करावा. अपघात टाळण्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी महामार्ग विभागाने आवश्यक ती कार्यवाही करावी,” अशी मागणी महामार्ग विभागाचे अभियंता दिलीप मेदगे (समन्वयक, पुणे-नाशिक महामार्ग) यांनी केली आहे.