मुंबई : Maharashtra Schools राज्यातील विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी ८ आणि ९ जुलै रोजी दोन दिवसीय राज्यव्यापी आंदोलन करणार आहेत. मुंबईतील आझाद मैदानावर आपल्या अनुदानासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन होणार असून, हजारो शिक्षक रस्त्यावर उतरले आहेत. अनेक शिक्षक संघटनांनी यास पाठिंबा दिला आहे.
या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा बंद राहतील, असा संभ्रम निर्माण झाला होता, आणि पालक व विद्यार्थ्यांमध्येही गोंधळाचे वातावरण होते. मात्र, शिक्षण विभागाने याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक महेश पालकर यांनी रविवारी रात्री उशिरा आदेश जारी करत स्पष्ट केलं की — राज्यातील कोणतीही शाळा आंदोलनामुळे बंद ठेवली जाणार नाही. नियोजित सुट्टी नसतानाही शाळा बंद ठेवणं विद्यार्थ्यांच्या हिताच्या विरोधात असल्याचं विभागाने म्हटलं आहे.
राज्य शासनाच्या या निर्णयामुळे, आज आणि उद्या शाळा नियमित सुरू राहतील. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थित राहावं, असं आवाहनही करण्यात आलं आहे.
या निर्णयामुळे काही पालक संभ्रमित झाले असून, “मुले शाळेत पाठवावी की नाही?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. काही भागांत विद्यार्थ्यांनी शाळेकडे मोर्चा वळवला असला तरी, शिक्षकांच्या अनुपस्थितीत शाळा कशी चालेल?, हा प्रश्नही सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
दुसरीकडे, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी आपली मागणी ठाम असल्याचं स्पष्ट केलं असून, आंदोलन मागे घेतलेले नाही. आता शासनाच्या आदेशानंतर प्रत्यक्षात शाळांमध्ये कितपत उपस्थिती राहते, आणि या आंदोलनाचा पुढचा टप्पा काय असेल, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.