Maharashtra New Expressway : महाराष्ट्रात रस्त्यांचे जाळे मजबूत करण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. काही दिवसांपूर्वीच समृद्धी महामार्गाचा इगतपुरी ते आमने हा शेवटचा ७६ किमीचा टप्पा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पित झाला. यानंतर मुंबई ते नागपूर हा ७०१ किलोमीटरचा प्रवास अधिक जलद आणि सुलभ झाला आहे.
या पार्श्वभूमीवर आता राज्यातील आणखी एका महत्त्वाच्या महामार्ग प्रकल्पासाठी हालचाली वेग घेऊ लागल्या आहेत. महाराष्ट्रातील सुवर्ण त्रिकोण समजल्या जाणाऱ्या मुंबई, पुणे आणि नाशिक या तीन प्रमुख शहरांपैकी पुणे – नाशिक दरम्यान नवीन औद्योगिक महामार्ग विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पुणे – नाशिक औद्योगिक महामार्ग प्रकल्पाचा प्रस्ताव सरकारकडे
राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) पुणे ते नाशिक व्हाया अहिल्यानगर हा औद्योगिक महामार्ग साकारण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठीचा सविस्तर प्रस्ताव आता राज्य सरकारकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.
या महामार्गाच्या अंतिम आराखड्यास २०२४ च्या फेब्रुवारी महिन्यातच मंजुरी मिळाली होती. त्यानंतर डीपीआर (Detailed Project Report) आणि फिजिबिलिटी रिपोर्ट देखील तयार करण्यात आला आहे. एकूण २८,४२९ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर कामाला औपचारिक सुरुवात होईल.
महामार्गाचा संभाव्य मार्ग आणि तपशील
महामार्गाची एकूण लांबी: १३३ किमी
अपेक्षित जमीन संपादन: सुमारे १५५० हेक्टर
मार्ग: पुणे जिल्ह्यातील खेड, शिरूर, आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यांतून, तर नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातून हा महामार्ग जाणार आहे.
हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर पुणे–नाशिक प्रवासात सुमारे २ तासांची घट होऊन तो फक्त ३ तासांमध्ये शक्य होणार आहे. परिणामी या मार्गावरील जिल्ह्यांमध्ये औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
याशिवाय, पुणे आणि नाशिकमधील व्यापारी आणि औद्योगिक क्षेत्रासाठी ही नवीन दळणवळणाची सुविधा अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. ४८ महिन्यांमध्ये प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याने येत्या काही वर्षांत राज्यात एक महत्त्वाचा विकासाचा टप्पा गाठला जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येतोय.