“Important Update on Pune-Nashik Industrial Highway: 35 km Work Completed; Work at Bhosale and Daulatabad T-Point to Begin Within 7 Days”
छत्रपती संभाजीनगर ते पैठण या ४२ किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्गाचे ३५ किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून उर्वरित कामांना लवकरच गती दिली जाणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांनी विधान परिषदेत दिली.विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.
महामार्गाच्या काही भागात काम सलग न झाल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या (एमजेपी) पाईपलाईनच्या कामामुळे काही तांत्रिक अडथळे निर्माण झाले होते, जे हायकोर्टाच्या देखरेखीखाली सुरू आहेत.
मात्र, हे काम ऑगस्ट अखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता असून त्यानंतर उर्वरित रस्त्याचे काम वेगाने होईल. वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने रस्त्यावर रंबल स्ट्रिप्स, दिशादर्शक फलक, रिफ्लेक्टर बोर्ड आदी सुरक्षाविषयक उपाययोजना लवकरच केल्या जाणार आहेत.
छत्रपती संभाजीनगर ते दौलताबाद टी पॉइंटचा प्रश्न देखील मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत मार्गी लावण्यात आला असून लवकरच कार्यवाही होईल. ५ मार्च २०२४ रोजी दौलताबाद टी पॉइंटसाठी निविदा काढण्यात आली होती. उच्च न्यायालयाचा निकाल २३ जून २०२५ रोजी लागल्यानंतर निविदा स्वीकृती प्रक्रिया पूर्ण झाली असून, पुढील सात दिवसांत कार्यारंभाचे देण्यात येतील.
पुणे-नाशिक औद्योगिक महामार्ग प्रकल्पाचा अंतिम निर्णय लवकरच घेण्यात येणार असून, एकदा मंजुरी मिळाल्यानंतर पुढील तीन वर्षांच्या आत हा महामार्ग पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधान परिषदेत दिली. सत्यजित तांबे यांनी उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेला उत्तर देताना मंत्री भुसे बोलत होते.
पुणे-नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्ग हा महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्याचे सांगून मंत्री भुसे म्हणाले की, सध्या तो अंतिम टप्प्यात आहे. या महामार्गामुळे पुणे ते नाशिक अंतर २.५ ते ३ तासांमध्ये पूर्ण होणार आहे. परिणामी दोन्ही शहरांमधील उद्योग, वाहतूक आणि पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. या महामार्गाच्या माध्यमातून दोन्ही शहरांदरम्यान एक मजबूत औद्योगिक कॉरिडॉर निर्माण होणार आहे.
प्रकल्पात जिराईत व बागायती जमिनींचे भूसंपादन होणार असून, शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. संपादन प्रक्रियेत शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच प्रत्येक टप्पा पार पडणार असून, कायदेशीर नियमांचे पालन करून न्याय्य मोबदला देण्यात येणार आहे. महामार्गाच्या अलाइनमेंट दरम्यान काही तांत्रिक बाबींचा विचार करावा लागत आहे, असेही भुसे यांनी चर्चेला उत्तर देताना सांगितले.
रस्त्याची अलाइनमेंट थोडी बदलून ७९७ झाडांचे रक्षण करण्यात यश आले आहे. पर्यावरणाचा समतोल राखत हे काम सुमारे २०० कोटी रुपयांच्या खर्चात पार पडत असून भू-संपादनाची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे.