पुण्यातील चतु:श्रृंगी परिसरात मानवी नात्यांना काळिमा फासणारी एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. वडिलोपार्जित मालमत्तेवर ताबा मिळवण्यासाठी एका भावाने आपल्या सख्ख्या बहिणीला वेड्याचे इंजेक्शन देत बळजबरीने मानसिक रुग्णालयात भरती केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी आरोपी धमेंद्र इंदूर रॉय आणि त्याच्यासोबत असलेल्या चार खासगी बाऊन्सरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५६ वर्षीय पीडित महिला चतु:श्रृंगी परिसरात वडिलोपार्जित मालमत्तेची एकटीच मालक आहे. तिच्यावर ताबा मिळवण्यासाठी तिचा सख्खा भाऊ धमेंद्र रॉय याने चार बाऊन्सरच्या मदतीने तिच्या घरात घुसून जबरदस्ती केली. पीडित महिला पूर्णपणे शुद्धीत असतानाही तिला डाव्या हातात इंजेक्शन देऊन बेशुद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर तिला रक्त तपासणीच्या बहाण्याने फसवून मानसिक रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या प्रकारामुळे महिलेवर मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारचा छळ झाला असून, तिला खोट्या उपचारांखाली ठेवण्यात आले होते.
चतु:श्रृंगी पोलिसांनी तातडीने कारवाई करत धमेंद्र रॉय आणि चार बाऊन्सरविरोधात भारतीय दंड संहितेच्या विविध गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी पीडितेची सुटका करून तिला सुरक्षित ठिकाणी हलवले असून, या कटामागे आणखी कोणी सहभागी आहे का, याचा सखोल तपास सुरू आहे.
या घटनेने भावंडांच्या नात्यावर विश्वासाचा प्रश्न निर्माण केला आहे. फक्त संपत्तीच्या लालसेपोटी अशा अमानुष कृत्याला कोणी उतरू शकते, हे पाहून परिसरात संतापाची लाट उसळली आहे. स्थानिक नागरिकांनी आरोपींवर कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे.
या प्रकरणामुळे मालमत्तेच्या वादातून उगम पावणाऱ्या हिंसक कृत्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कडक कायदे आणि सामाजिक जागरूकता आवश्यक असल्याची गरज अधोरेखित झाली आहे.