BIG NEWS : पुण्यातील ‘हे’ प्रसिद्ध हॉटेल पुन्हा वादात; अंडा भुर्जीमध्ये झुरळ आढळल्याने प्रचंड खळबळ
पुण्यातील फर्ग्युसन रोडवरील प्रसिद्ध गुडलक कॅफे पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. काही दिवसांपूर्वी बन मस्कामध्ये काचेचा तुकडा सापडल्याची घटना ताजी असतानाच, आता मुंबई-पुणे हायवेवरील एका फूड प्लाझामध्ये असलेल्या गुडलक कॅफेमध्ये अंडा भुर्जीमध्ये झुरळ आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
एका ग्राहकाने या कॅफेमधून अंडा भुर्जीची ऑर्डर दिली होती. जेवताना त्याला भुर्जीमध्ये मरण पावलेलं झुरळ आढळल्याचा आरोप त्याने केला आहे. यासंदर्भातील फोटो आणि खरेदीचं बिलही संबंधित व्यक्तीने शेअर केलं आहे. त्यामुळे स्वच्छतेच्या दृष्टीने या ब्रँडवर पुन्हा एकदा संशयाचं सावट घोंगावू लागलं आहे.
याआधी फर्ग्युसन रोडवरील गुडलक कॅफेमध्ये बन मस्कामध्ये काचेचा तुकडा सापडल्याचा प्रकार घडला होता. त्या घटनेनंतर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) तातडीने कारवाई करत कॅफेचा परवाना तात्पुरता रद्द केला होता.
FDA ने नमूद केलेल्या त्रुटी:
कर्मचाऱ्यांकडे वैद्यकीय प्रमाणपत्र नव्हते
किचनमधील टाईल्स तुटलेल्या होत्या
ठिकठिकाणी साचलेलं पाणी
फ्रिजमध्ये अस्वच्छता
किचन व बाहेरील कचरापेट्या उघड्या अवस्थेत
FDA कडून सांगण्यात आलं होतं की या त्रुटींची पूर्तता झाल्यानंतरच परवानगी पुन्हा दिली जाईल. मात्र, त्याआधीच अंडा भुर्जीमधील झुरळ प्रकरण उघडकीस आल्यानं गुडलक कॅफेच्या ब्रँड इमेजवर मोठा धक्का बसला आहे.
स्वच्छता आणि ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अशा घटना गंभीर मानल्या जात असून, ग्राहकांमध्ये यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.