Bharat Bandh 9 July 2025 : शाळा सुरू राहणार, मात्र वाहतुकीवर परिणाम; कोणती सेवा बंद, कोणती सुरू? वाचा सविस्तर

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या उद्योगपूरक धोरणांविरोधात देशातील प्रमुख कामगार आणि शेतकरी संघटनांनी ९ जुलै रोजी ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. या आंदोलनात देशभरातील सुमारे २५ कोटी कामगार सहभागी होणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. बंदला बँकिंग, विमा, टपाल, कोळसा खाणी, कारखाने आणि राज्य परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांचा पाठिंबा मिळणार आहे.

कशामुळे पुकारला आहे भारत बंद?

कामगार संघटनांचा आरोप आहे की, ‘Ease of Doing Business’च्या नावाखाली केंद्र सरकारने कामगार हक्कांवर गदा आणणाऱ्या चार नवीन कामगार संहितांचा (Labour Codes) प्रस्ताव मांडला आहे. यामुळे कामगारांचे सामूहिक सौदाशक्तीचे अधिकार (Collective Bargaining) कमकुवत होतील आणि त्यांच्या संघटनात्मक शक्तीवर मर्यादा येतील.

या संघटनांनी याआधी श्रममंत्री मनसुख मांडविया यांना १७ कलमी मागण्यांचे निवेदन दिले होते. पण त्यावर अद्याप ठोस कृती झालेली नाही. याशिवाय सरकार वार्षिक श्रम परिषद (Annual Labour Conference) घेत नाही, बेरोजगारी वाढली आहे आणि शासकीय विभागात नियमित भरतीऐवजी निवृत्त कर्मचाऱ्यांची पुनर्नियुक्ती केली जात असल्याचेही संघटनांचे म्हणणे आहे.


भारत बंद 9 जुलै 2025: कोणत्या सेवा ठप्प होणार?

प्रभावित सेवा:

  • बँकिंग सेवा
  • टपाल सेवा
  • कोळसा खाणकाम व कारखाने
  • राज्य परिवहन सेवा
  • सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम व शासकीय कार्यालये

कोणत्या सेवा सुरू राहणार?

  • शाळा व महाविद्यालये:
    केंद्र किंवा राज्य सरकारकडून शाळा/कॉलेज बंद ठेवण्याबाबत कोणतेही आदेश आलेले नाहीत. बंद पुकारणाऱ्या संघटनांनीही याबाबत काही सूचना दिलेल्या नाहीत. त्यामुळे शाळा व कॉलेज सुरू राहतील.
  • खासगी कार्यालये:
    बहुतांश खासगी संस्था आणि कंपन्या सुरू राहतील. मात्र कर्मचाऱ्यांना प्रवास करताना अडचणी येऊ शकतात.
  • रेल्वे सेवा:
    अद्याप रेल्वे कर्मचाऱ्यांनी बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला नाही. तथापि आंदोलनांमुळे रेल्वे सेवेत विलंब किंवा व्यत्यय येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पालकांनी काय करावे?

शाळा बंद राहणार नाहीत, मात्र सार्वजनिक वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेता, विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यापूर्वी परिसरातील वाहतूक आणि आंदोलनाची स्थिती तपासूनच निर्णय घ्यावा, असे सुचवले जात आहे.


कामगार संघटनांचे मुख्य मुद्दे:

  • कामगार संहितांद्वारे हक्कांवर गदा
  • बेरोजगारीत वाढ
  • जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या
  • शिक्षण, आरोग्य, नागरी सुविधा यांसाठी सरकारचा खर्च घटला
  • युवापिढीसाठी शासकीय भरती संधी घटल्या

‘भारत बंद’मुळे काही सरकारी कार्यालये आणि सार्वजनिक सेवा अंशतः ठप्प होऊ शकतात. नागरिकांनी आवश्यक कामांसाठी पूर्वतयारी ठेवावी, तसेच अधिकृत सूचनांकडे लक्ष ठेवावे.