गांधींच्या पुतळ्यावर हल्ला म्हणजे भारताच्या मूल्यांवर चालून आलेला धोका : अक्षय जैन, युवक काँग्रेस

पुणे  : पुणे रेल्वे स्थानक परिसरातील महात्मा गांधींच्या पुतळ्यावर करण्यात आलेल्या हल्ल्याने संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. हा हल्ला केवळ एका व्यक्तीचा माथेफिरूपणा नसून, हा विचारपूर्वक घडवून आणलेला व देशातील सहिष्णुतेच्या मुळांवर घाव घालणारा प्रकार असल्याचा ठपका महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने लावला आहे.

युवक काँग्रेसच्या माध्यम विभागाचे अध्यक्ष अक्षय जैन यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया नोंदवली आहे. ते म्हणाले, “हा प्रकार म्हणजे केवळ गांधींच्या पुतळ्यावर हल्ला नाही, तर देशाच्या मूलभूत मूल्यांवर, अहिंसेच्या तत्वांवर व सत्याग्रहाच्या विचारसरणीवर झालेला थेट आघात आहे. हा हल्ला एकट्या व्यक्तीने नाही केला, ही एक विषारी राजकीय प्रवृत्ती आहे — जी गेल्या दशकात पद्धतशीर पेरली जात आहे.”

अक्षय जैन यांनी थेट संघ-भाजपच्या विचारसरणीवर टीका केली. “२०१४ नंतर जाणीवपूर्वक गांधीविरोधी वातावरण तयार करण्यात आले. गोडसेच्या समर्थकांना पाठीशी घालणाऱ्या वक्तव्यांनी सुरज शुक्ला सारखी मंडळी बिनधास्त हिंसेचा मार्ग स्वीकारतात. ही केवळ एक व्यक्ती नसून, ती एक पद्धतशीर ‘गोडसेविचारांची मशीनरी’ आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

या हल्ल्याला केवळ गुन्हेगारी स्वरूपाचा न समजता, त्यामागील प्रेरणा, उद्दिष्ट व सामाजिक परिणाम लक्षात घेता युवक काँग्रेसने UAPA (Unlawful Activities Prevention Act) अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे.

“गांधीविचारांचा द्वेष पसरवणं आणि त्यावर कोयते चालवणं ही देशाच्या सामाजिक ऐक्याला फोडण्याची योजना आहे. यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. केवळ पोलिस केस पुरेशी नाही, ही देशविरोधी विचारधारेची पार्श्वभूमी तपासली गेली पाहिजे,” असा ठाम आग्रह जैन यांनी धरला.

शेवटी, युवक काँग्रेसने ही भावना व्यक्त केली की “गांधींच्या मूर्तींवर हल्ले करून गांधींचा विचार संपणार नाहीत. गांधी हे जगाने मान्य केलेले सत्याचे प्रतीक आहेत. गोडसेविचार क्षणभंगुर आहे. गांधीविचारच देशाचे भविष्य आहे, कारण तो मानवतेचा, सहिष्णुतेचा आणि अहिंसेचा मार्ग आहे.”

या घटनेनंतर पुण्यासह राज्यभरात विविध सामाजिक, राजकीय आणि गांधी विचार मानणाऱ्या संघटनांनी निषेध नोंदवला आहे. पुणे रेल्वे स्थानकावरील सुरक्षा यंत्रणेवरही प्रश्न उपस्थित होत असून, यापुढे अशा पुतळ्यांची सुरक्षा कशी वाढवायची याबाबतही चर्चा सुरू झाली आहे.