६ जुलैला पंढरपूर येथे होणार भव्य वारकरी महाअधिवेशन

 

वारकर्‍यांच्या श्रद्धास्थानांवर होणारे आघात आणि संघटन, तसेच विविध प्रश्‍नांसाठी 

एकादशीला (६ जुलैला) पंढरपूर येथे भव्य वारकरी महाअधिवेशन ! – श्री. सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

पंढरपूर – प्रतिवर्षी लक्षावधी वारकरी आषाढी, कार्तिकीच्या निमित्ताने पंढरपूर येथे श्री विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होतात. ‘लोचनात त्रिभुवन अवघे लेकरांस गवसुन जाय माझी पंढरीची माय, माझी पंढरीची माय’, असे म्हणत वारकर्‍यांच्या दिंड्या पंढरपूर येथे विसावत आहेत. वारकरी संप्रदायाचे धर्मकार्य आणि राष्ट्रनिष्ठा ही महाराष्ट्राची खरी ओळख आहे. गेली अनेक शतके वारकरी संप्रदाय नैतिक मूल्ये, संस्कृतीरक्षण आणि देशभक्ती यांची शिकवण देत आला आहे. आजच्या काळातही धर्म, संस्कृती आणि राष्ट्र यांच्या हितासाठी वारकरी समाज अग्रभागी आहे. महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात असूनही अद्याप पंढरपूर आणि आळंदी येथील तीर्थक्षेत्रांना म्हणाव्या अशा सुविधा नाहीत. याचसमवेत  आळंदी येथे प्रस्तावित असलेला कत्तलखाना, वारीत होणारी घुसखोरी, संतांच्या श्‍लोकांचा चुकीचा अर्थ लावून लोकांची दिशाभूल करणे यांसह अन्य प्रश्‍नांचा वाचा फोडणे यांसह  जाज्वल्य भक्ती अन् राष्ट्रनिष्ठा यांच्या भूमिकेतून, वारकरी ऐक्य साधून महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे कराव्यात, यासाठी एकादशीला (६ जुलैला) पंढरपूर येथे भव्य वारकरी अधिवेशन घेण्यात येणार आहे.

हे अधिवेशन सद्गुरु श्री गंगागिरी महाराज मठ, भक्तीमार्ग, जनकल्याण हॉस्पिटलच्या शेजारी, पंढरपूर येथे दुपारी १ ते ३.३० या वेळेत घेण्यात येणार आहे. महंत गुरुवर्य प.पू. रामगिरी महाराज या अधिवेशनाचे अध्यक्ष असून या अधिवेशनात ज्येष्ठ किर्तनकार संतवीर ह.भ.प. बंडातात्या कराडकर, महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे अध्यक्ष ह.भ.प. रामेश्‍वरशास्त्री महाराज आणि सचिव ह.भ.प. नरहरी महाराज चौधरी, पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी संस्थानचे विश्‍वस्त ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ, महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष श्री. शेखर मुंदडा, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे विश्‍वस्त ह.भ.प. माणिक महाराज मोरे, श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज संस्थान आळंदीचे प्रमुख विश्‍वस्त योगी निरंजननाथ, ह.भ.प. छोटे कदम माऊली, ह.भ.प. नरेंद्र महाराज मस्के, श्रीक्षेत्र अपेगाव येथील ह.भ.प. विष्णु महाराज अपेगावकर, अखिल भारतीय संत समितीचे प्रदेश महामंत्री स्वामी भारतानंद सरस्वती महाराज, महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे कोकण प्रांताध्यक्ष ह.भ.प. भगवान महाराज कोकरे, राष्ट्रीय वारकरी परिषदेचे ह.भ.प. मारुति महाराज तुनतुने आणि कार्याध्यक्ष ह.भ.प. बापू महाराज रावकर, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगडचे राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांसह संत- महंत, ह.भ.प., धर्माचार्य, हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. या अधिवेशनात धर्मरक्षणार्थ कार्यरत धर्मरक्षकांचे सन्मान करण्यात येणार आहेत. तरी या अधिवेशनासाठी मोठ्या संख्येने वारकरी-भाविक यांनी उपस्थित रहावे, तसेच अधिक माहितीसाठी श्री. राजन बुणगे – ९७६२७२१३०४ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. 

अधिवेशनात चर्चा केले जाणारे आणि मार्गदर्शन केले जाणारे वारकर्‍यांचे जिव्हाळ्याचे विषय 

१. पंढरपूर, देहू, आळंदी, पैठण, मुक्ताईनगर यांसह सर्व तीर्थक्षेत्रे कायमस्वरूपी मद्य आणि मांस यांपासून मुक्त करावीत, तसेच या सर्व तीर्थक्षेत्री १० किलोमीटर परिसरात अहिंदूंच्या धर्मप्रसारावर बंदी आणावी ! 

२. संत, संत-वांङ्मय, राष्ट्रपुरुष, धर्म, देवता आदींचा अवमान करणार्‍यांवर कठोर कारवाई होण्यासाठी ईशनिंदा प्रतिबंधक कायदा लागू करावा ! 

३. संतांच्या श्‍लोकांचा चुकीचा अर्थ लावून वारीचे वातावरण कलुषित करणार्‍यांना शासनाने कायमचा प्रतिबंध करावा. 

४. गोहत्या आणि गोतस्करी रोखण्यासाठी महाराष्ट्रातील गोहत्या प्रतिबंधक कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी ! 

५. हिंदु युवतींचे रक्षण होण्यासाठी येत्या पावसाळी अधिवेशनात ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा तात्काळ संमत करावा. 

६. इंद्रायणी आणि चंद्रभागा या नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी !