गुरुपौर्णिमेनिमित्त लेख

 

सध्याच्या कलीयुगात राष्ट्र आणि आत्मोद्धारासाठी राष्ट्रगुरुंची आवश्यकता ! 

गुरुपौर्णिमेनिमित्त लेख 

 प्रस्तावना – आजचा काळ हा केवळ तंत्रज्ञानाचा किंवा भौतिक उन्नतीचा नाही, तर आध्यात्मिक आणि सांस्कृतिक अस्तित्वासाठी संघर्षाचा काळ आहे. आपल्या देशात धर्माचरण, साधना आणि गुरुकृपा यांचा विसर पडत चाललेला असताना समाजाला दिशा देणाऱ्या राष्ट्रगुरूंची अधिक गरज निर्माण झाली आहे. भारतभूमीला इतिहासात जेव्हा जेव्हा संकट आले, तेव्हा आर्य चाणक्य, समर्थ रामदासस्वामी यांसारख्या गुरूंनी समाजाला जागृत केलं, राष्ट्रासाठी लढणारे शिष्य घडवले आणि परकीय आक्रमणांच्या काळात हिंदुस्थानच्या अस्तित्वाला नवसंजीवनी दिली. कालसुसंगत अध्यात्मिक मार्गदर्शन आणि राष्ट्रहिताचे भान असलेले गुरूच भारताला पुन्हा एकदा वैभवाकडे घेऊन जाऊ शकतात. त्यामुळे आजही हिंदू समाजाला धर्मशिक्षणाची, साधनेची आणि राष्ट्रनिष्ठ गुरूंच्या मार्गदर्शनाची अत्यंत गरज आहे.१० जुलै रोजी गुरुपौर्णिमा आहे हा दिवस गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो. या दिवशी गुरुतत्व अधिक प्रमाणात कार्यरत असते. याचा सर्वानी लाभ करून घेऊया. 

जीवनातील साधनेचे आणि गुरूंचे महत्त्व ! – १) छत्रपती शिवाजी महाराज हे कुलदेवता श्री भवानीदेवीचे निस्सीम भक्त होते. त्यांच्या मुखात नेहमी ‘जगदंब जगदंब’ असा नामजप असे. त्यांचे सैन्यही लढतांना ‘हर हर महादेव’चा गजर करत असे. त्यामुळे मनुष्यबळ आणि साधनसामुग्री अल्प असूनही ते पाच बलाढ्य पातशाह्यांना नमवून ‘हिंदवी स्वराज्या’ची स्थापना करू शकले. त्यांच्या साधनेमुळेच त्यांना संत तुकाराम महाराज आणि संत रामदासस्वामी यांचे आशीर्वाद मिळाले अन् मोठमोठ्या संकटांतून त्यांचे रक्षण झाले.

२) अर्जुन उत्तम धनुर्धर होताच; त्याचबरोबर तो श्रीकृष्णाचा भक्तही होता. बाण सोडतांना तो नेहमी श्रीकृष्णाचे नाव घेऊन सोडत असे. त्यामुळे त्याचे बाण आपोआप लक्ष्यवेधी होत असत. श्रीकृष्णाच्या नामामुळे अर्जुनाच्या मनातील लक्ष्यवेध घेण्याचा संकल्प सिद्ध होत असे.

राष्ट्र अन् धर्म रक्षणाची शिकवण देणार्‍या गुरूंचे कार्य ! – 

१) आर्य चाणक्य – आर्य चाणक्य यांची तक्षशिला विद्यापिठात ‘आचार्य’ या पदावर नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी केवळ विद्यादानातच धन्यता मानली नाही, तर चंद्रगुप्तासारख्या अनेक शिष्यांना क्षात्र-उपासनेचा महामंत्र देऊन त्यांच्याकरवी परकीय ग्रीकांचे हिंदुस्थानवरील आक्रमण मोडून काढले अन् हिंदुस्थानला एकसंध बनवले.

२) समर्थ रामदासस्वामी – प्रत्यक्ष प्रभु रामरायाचे दर्शन झालेले समर्थ रामदासस्वामी केवळ रामनामाचाच जप करण्यात रममाण झाले नाहीत, तर समाजाने बलोपासना करण्यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी मारुतींची स्थापना केली अन् शिवाजी महाराज यांना अनुग्रह देऊन त्यांच्याकडून ‘हिंदवी स्वराज्या’ची स्थापना करवून घेतली.

३) स्वामी वरदानंद भारती आणि महायोगी गुरुदेव काटेस्वामीजी – अलीकडच्या काळात होऊन गेलेले स्वामी वरदानंद भारती आणि महायोगी गुरुदेव काटेस्वामीजी, हेही असेच थोर गुरु होत. 

   धर्म अन् अध्यात्म यांची शिकवण देण्यासह या महान पुरुषांची लेखणी तळपली ती राष्ट्र अन् धर्म यांच्या कर्तव्यांविषयी निद्रिस्त असलेला हिंदू समाज जागृत करण्यासाठी ! असे कितीतरी गुरु आहेत की, ज्यांनी स्वतःच्या आचार-विचारांतून आपल्या शिष्यांना अन् समाजालाही राष्ट्र अन् धर्म रक्षणाच्या पवित्र कार्याचा आदर्श घालून दिला आहे.

काळाची आवश्यकता ओळखून राष्ट्र अन् धर्मरक्षणाची शिकवण देणे, हे गुरूंचे आजचे आद्य कर्तव्यच !

शिष्याला ईश्वरप्राप्तीची वाट दाखवणे, हा जसा गुरूंचा धर्म आहे, तसेच राष्ट्र अन् धर्म यांच्या रक्षणासाठी समाजाला जागृत करणे, हाही गुरूंचा धर्मच आहे. आर्य चाणक्य, समर्थ रामदासस्वामी यांसारख्या गुरूंचा आदर्श आपल्यासमोर आहे. आज आपले राष्ट्र अन् धर्म यांची स्थिती अत्यंत विदारक आणि केविलवाणी झाली आहे. काळाची आवश्यकता ओळखून शिष्यांना आणि समाजाला साधना करत राष्ट्र अन् धर्म यांच्या रक्षणाची शिकवण देणे, हे गुरूंचे आजचे आद्य कर्तव्य आहे. हिंदु धर्मात गुरु शिष्य परंपरा अनादी काळापासून सुरु आहे. गुरु शिष्य परंपरेचा आपण अंगीकार करून आपली आणि आपल्या राष्ट्राची प्रगती करणे, हे पण आपले कर्तव्यच आहे.

रामराज्याच्या स्थापनेसाठी साधना आणि भक्ती आवश्यक ! 

भारतभूमीवर एका आदर्श अशा राष्ट्राची; म्हणजेच हिंदु राष्ट्राची, सनातन राष्ट्राची स्थापना करण्याचे आपले ध्येय आहे. त्यासाठी प्रभु श्रीरामचंद्रांचे रामराज्य हे आदर्श आहे. रामराज्यातील प्रजा धर्माचरणी होती; म्हणूनच तिला श्रीरामासारखा सात्त्विक राज्यकर्ता लाभला आणि आदर्श असे रामराज्य उपभोगता आले. पूर्वीसारखेच रामराज्य, म्हणजे हिंदु राष्ट्र आताही निर्माण करायचे असेल, तर यासाठी हिंदु समाज धर्माचरणी आणि ईश्वराचा भक्त बनला पाहिजे. पूर्वीच्या काळी बहुसंख्य लोक साधना करणारे आणि धर्माचरणी असल्यामुळे बहुतेक जण सात्त्विक होते. कलियुगामध्ये बहुसंख्य लोकांना साधना आणि धर्माचरण यांविषयी अज्ञान आहे. त्यामुळे रज-तमाचे प्रमाण पुष्कळ वाढले आहे. याचाच परिणाम म्हणून राष्ट्र आणि धर्म यांची स्थिती अतिशय बिकट झाली आहे. हे पालटण्यासाठी प्रत्येकाने धर्मशिक्षण घ्यायला हवे आणि त्याचबरोबर साधनाही करायला हवी. 

हिंदुना धर्मशिक्षण देणारी व्यवस्था निर्माण करायला हवी ! 

हिंदु समाज धर्माचरणी बनवायचा असेल, तर हिंदु धर्माची सद्यस्थिती समजून घेणे आवश्यक आहे. इतर धर्मियांना धर्मशिक्षण देण्यासाठी त्यांच्या प्रार्थनास्थळांमध्ये त्यांचे धर्मगुरु असतात, उदा. चर्चमध्ये पाद्री आणि मशिदींमध्ये मौलवी त्यांच्या त्यांच्या धर्मियांना शिक्षण देतात. त्यामुळे खिश्चनांना ‘बायबल’ आणि मुसलमानांना ‘कुराण’ थोडेतरी ठाऊक असते. याउलट हिंदूंना गीतेविषयी ठाऊक असेलच, असे नाही. गीतेचे नुसते वाचन करणारेसुद्धा अल्प आहेत; वाचून समजणारे तर फारच अल्प आहेत आणि वाचून समजून घेऊन त्यानुसार कृतीत आणणारा तर लाखो कोट्यवधीत एखादाच असेल. जवळजवळ ८० टक्के व्यक्तींना अध्यात्म या विषयाचे खरे शिक्षण नसल्याने त्याविषयी त्यांच्यात अज्ञानच असते. सद्य:स्थितीत हिंदूंना धर्मशिक्षण देणारी कोणती व्यवस्थाच उपलब्ध नाही, अशी व्यवस्था आपल्याला निर्माण करावी लागेल.

काळानुसार आवश्यक साधना ! – केवळ वैयक्तिक मोक्षाचा मार्ग दाखवणं ही गुरूंची जबाबदारी नसून, राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी शिष्याला सज्ज करणं हेही त्यांचेच कर्तव्य आहे. राष्ट्र, धर्म आणि समाज संकटात असताना, त्याचे नेतृत्व करणारे गुरू आजच्या काळात आवश्यक आहेत. इतिहासाने दाखवून दिले आहे की, आर्य चाणक्य, समर्थ रामदासस्वामी यांसारख्या राष्ट्रगुरूंनी चारित्र्यसंपन्न शिष्य आणि जागृत समाज घडवून अखंड भारताच्या रक्षणासाठी मार्गदर्शन केले. आज पुन्हा त्या ध्येयधोरणांची गरज आहे. थोडक्यात, काळाची आवश्यकता ओळखून राष्ट्र अन् धर्म यांच्या रक्षणासाठी साधना करण्याची शिकवण शिष्यांना आणि समाजाला देणे, हे गुरूंचे आजचे प्रमुख कर्तव्य आहे. राष्ट्र अन् धर्म रक्षण, ही त्यांची, तसेच शिष्य अन् समाज यांचीही काळानुसार आवश्यक अशी साधनाच आहे !

संकलक – श्री. पराग गोखले ,  सौजन्य – हिंदु जनजागृती समिती 

संपर्क क्रमांक – ८९८३३३५५१७