MNS – UBT : मनसे सोबत जाण्याबाबत अखरे उद्धव ठाकरे बोलले; म्हणाले…”जे महाराष्ट्राच्या जनतेच्या…

By: Editor_Pratik

On: Friday, June 6, 2025 9:01 AM

shiv-sena-ubt-chief-uddhav-thack
Google News
Follow Us

MNS – UBT : मनसे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या संभाव्य युतीबाबत उद्धव ठाकरे यांनी आज सूचक विधान केले. “जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे, ते होईल,” असे म्हणत त्यांनी या चर्चांना आणखी बळ दिले.

आज मातोश्रीवर सुजाता शिंगाडे यांच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील घरवापसी सोहळ्यादरम्यान उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मनसेसोबतच्या युतीबाबत विचारले असता, त्यांनी थेट उत्तर देणे टाळले, परंतु “बघू, जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे, ते होईल” असे सूचक विधान केले.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी सुजाता शिंगाडे यांच्या पुनरागमनाचे कौतुक केले. “सुजाता ताईंनी त्यांच्या भावना नेमक्या शब्दात व्यक्त केल्या. त्या शिवसेना सोडणार हे ऐकून धक्का बसला, वाईट वाटलं. ठिक आहे, तो इतिहास झाला आहे. तिथे बेबंदशाही पाहिली.

कशासाठी लोक तिकडे जात आहेत हे तुम्ही जवळून पाहिलं. तिथे तुम्ही कुणाशी जुळून घ्याल असं वाटत नव्हतं. वातावरण विचित्र होतं,” असे ते म्हणाले. पुढे ते म्हणाले की, “काही जण तिकडे जातात, तिकडे गेल्यावर काहींना पश्चात्ताप होतो. पण तुम्ही जे धाडस आणि हिंमत दाखवली ते फार कमी लोकांमध्ये आहे. लाचारांमध्ये धाडस राहत नाही. तुम्ही अनुभव संपन्न झाला आहात. तुम्ही आणखी जोरात काम कराल.”

युतीच्या प्रश्नावर अधिक स्पष्टीकरण देताना उद्धव ठाकरे म्हणाले, “बाकीचे बारकावे आम्ही पाहत आहोत. सुजाता ताई आज आपल्या घरी आल्या आहेत. ती महत्त्वाची बातमी आहे. त्यांचा पुनरप्रवेश हा तमाम शिवसैनिकांसाठी संदेश आहे.” मनसे-ठाकरे गटाच्या युतीवर काय संदेश द्याल, यावर उद्धव ठाकरे म्हणाले, “संदेश कशाला? मी बातमीच देईन तुम्हाला. माझ्याकडे शिवसैनिकांच्या मनात संभ्रम नाही. त्यांचेही सैनिक आमच्या संपर्कात आहेत. दोन्ही सैनिकांमध्ये संभ्रम नाही. आम्ही जी बातमी द्यायची ती देऊ.”

आज सकाळी संजय राऊत यांनीही मनसे आणि ठाकरे गटातील संभाव्य युतीबाबत सकारात्मक संकेत दिले होते. “राज ठाकरे यांचे घर आमच्यासाठी दुसरे घर आहे,” असे मोठे वक्तव्य त्यांनी केले होते. “आम्ही सकारात्मक आहोत, म्हणून खाली कार्यकर्त्यांचे मनोमिलन सुरू आहे तुम्ही हे समजून कसं घेत नाही. नेत्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे कार्यकर्त्यांचे मनोबल वाढलं आहे. आम्ही सकारात्मक आहोत. राज ठाकरे सकारात्मक आहेत, त्यांचे सहकारी सकारात्मक आहेत. उद्धव ठाकरे सकारात्मक आहेत. अत्यंत सकारात्मक असल्यामुळे जमिनीवरच्या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांच मनोमिलन झालं असेल, त्याच्यामध्ये चिंतेच कारण काय,” असे राऊत म्हणाले होते.

एकंदरीत, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या आजच्या वक्तव्यांमुळे मनसे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील संभाव्य युतीची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026