‘कथा दोन भावांची’: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील राजकीय संघर्षाची गाथा

By: Editor_Pratik

On: Friday, June 6, 2025 12:49 PM

Raj and uddhav
Google News
Follow Us

महाराष्ट्राच्या राजकारणात ‘ठाकरे’ हे नाव नेहमीच उठून दिसले आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी लढणारी संघटना म्हणून उदयास आली. बाळासाहेबांच्या एका हाकेवर मुंबई बंद होत असे आणि लाखो शिवसैनिक रस्त्यावर उतरत असत. याच ‘धगधगता अंगार’ असलेल्या शिवसेनेचा वारसा पुढे कोण चालवणार यावरून ठाकरे कुटुंबात आणि पक्षात संघर्ष सुरू झाला, ज्याची परिणीती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या चुलत भावांच्या राजकीय वितुष्टात झाली.

राज ठाकरेंचा उदय आणि ‘भावी सेनाप्रमुख’ वाद

बाळासाहेबांची तीनही मुले राजकारणात फारशी सक्रिय नसताना, पुतण्या राज ठाकरे लहानपणापासूनच काकांच्या सोबत सभा, मोर्चे आणि बैठकांना उपस्थित राहत होते. त्यांच्यात बाळासाहेबांची छबी दिसू लागली. १९८८ मध्ये त्यांनी शिवसेनेच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली आणि लवकरच त्यांना युवा संघटना, भारतीय विद्यार्थी सेनेची जबाबदारी मिळाली. राज ठाकरेंच्या करिष्म्यामुळे अवघ्या काही महिन्यांत विद्यार्थी सेनेने मुंबई, पुणे, नाशिक या पट्ट्यात बाळ धरले. बाळासाहेबांसारखा लूक, करारी नजर आणि भाषणशैलीमुळे राज ठाकरेंची लोकप्रियता वाढत गेली आणि अनेकांना त्यांच्यात शिवसेनेचे भावी नेतृत्व दिसू लागले.

याच काळात ‘भावी सेनाप्रमुख’ या शब्दावरून संघर्षाची बीजे रोवली गेली. राज ठाकरेंच्या समर्थकांनी ‘भारतीय विद्यार्थी सेनाप्रमुख’ याचा अर्थ ‘भावी सेनाप्रमुख’ असा लावला, ज्यामुळे काही जणांना ते खटकले. परिणामी, ‘भारतीय विद्यार्थी सेनाप्रमुख’ ऐवजी ‘अखिल भारतीय विद्यार्थी सेनाप्रमुख’ असा उल्लेख होऊ लागला, जो शिवसेनेच्या एकमेव संघटनेत ‘अखिल भारतीय’ हा शब्द होता. ही एका मोठ्या संघर्षाची पहिली चुणूक होती.

सत्ता, आरोप आणि उद्धव ठाकरेंची एंट्री

१९९५ मध्ये शिवसेना-भाजप युती सत्तेवर आल्यानंतर, मनोहर जोशींच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाले आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या हातात सत्तेचा रिमोट कंट्रोल होता. याच काळात, रमेश केणी हत्या प्रकरणात राज ठाकरेंचे नाव पुढे आले. हे प्रकरण सरकारमधील काही लोकांनीच राज ठाकरेंना बदनाम करण्यासाठी काढले, अशी तेव्हा चर्चा होती.

राज ठाकरेंवर आरोपांच्या फैरी झाडल्या जात असताना, दुसरीकडे शिवसेनेच्या भावी नेतृत्वाची नेपथ्य रचना सुरू झाली. उद्धव ठाकरे, जे तोपर्यंत पडद्यामागून काम सांभाळत होते (उदा. बाळासाहेबांच्या सभांचे फोटोग्राफिक डॉक्युमेंटेशन), हळूहळू पक्षात सक्रिय होऊ लागले. तिकीट वाटपात त्यांचा मोठा सहभाग दिसू लागला. उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदा जाहीर व्यासपीठावर भाषण केले आणि हा एक महत्त्वाचा टर्निंग पॉइंट ठरला. यातून उद्धव ठाकरेंची पक्षात औपचारिकपणे एंट्री झाली, ज्यामुळे राज ठाकरेंच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली.

नेतृत्वाचा संघर्ष आणि कार्यकारी अध्यक्षपदाची घोषणा

१९९७ च्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये, उद्धव ठाकरे पक्षाचे नेतृत्व म्हणून पुढे आले. राज ठाकरेंकडे विद्यार्थी सेना असल्याने त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने होते. मात्र, राज ठाकरेंच्या समर्थकांना बाजूला सारण्यासाठी उद्धव ठाकरेंनी स्वतःची माणसे पक्षात आणण्यास सुरुवात केली.

१९९९ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये नारायण राणे यांच्या नेतृत्वात शिवसेनेने निवडणूक लढवली. बहुमत मिळाल्यास राणे मुख्यमंत्री होतील असे त्यांना वाटत असताना, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदासाठी बाळासाहेबांकडे आग्रह धरण्याचे निरोप जाऊ लागले. या सगळ्या घडामोडींमध्ये राज ठाकरे फक्त भाषणांपुरते आणि गर्दी खेचण्यापुरते मर्यादित राहिले. शिवसेनेची सूत्रे उद्धव ठाकरेंच्या हातात द्यावीत अशी उघडपणे चर्चा सुरू झाली, ज्यामुळे राज ठाकरे अस्वस्थ झाले.

निवडणूक आयोगाच्या नव्या नियमांनुसार, पक्षाची रचना बदलून कार्यकारी अध्यक्षपद निर्माण करणे आवश्यक होते. महाबळेश्वर येथे झालेल्या शिबिरात, ही घोषणा कोण करणार हा प्रश्न अनेकांना सतावत होता. राज ठाकरेच कार्यकारी प्रमुख होतील असे वाटत असताना, राज ठाकरेंनीच माईक हातात घेऊन उद्धव ठाकरे यांचे नाव कार्यकारी अध्यक्ष म्हणून जाहीर केले. या घोषणेने अनेकांना धक्का बसला आणि पक्षामध्ये सुप्त संघर्षाला सुरुवात झाली.

नारायण राणेंचे बंड आणि राज ठाकरेंची नाराजी

उद्धव ठाकरेंच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवडीनंतर फक्त दोन भावांमध्येच नाही, तर तिसरी व्यक्ती, नारायण राणे देखील अस्वस्थ झाले. २००५ मध्ये नारायण राणेंनी शिवसेना सोडली, ज्यामुळे मालवणची पोटनिवडणूक जाहीर झाली. या प्रचारादरम्यान, राज ठाकरे अचानक दौरा अर्धवट सोडून मुंबईला परतले. राज ठाकरेंनी नंतरच्या काळात दावा केला की, या दौऱ्यात त्यांच्यासोबत घातपाताचा कट आखला गेला होता, ज्यामुळे त्यांचा संताप वाढला.

याच काळात राज ठाकरेंनी शिवसेनेत अस्तित्व टिकवण्यासाठी शेवटची सत्ता वाटपाची मागणी केली. त्यांना नाशिक, पुण्यातल्या संघटनेची संपूर्ण जबाबदारी हवी होती, परंतु त्यांना पुणे आणि कोकण (ठाणे-मुंबई वगळून) देण्याची ऑफर मिळाली, जी त्यांना मान्य नव्हती.

‘जय महाराष्ट्र’ आणि मनसेची स्थापना

अखेरीस, २००५ मध्ये राज ठाकरेंनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांनी “विठ्ठलाशी भांडण नाही, पण विठ्ठलाला बडव्यांनी घेरले आहे” असे वक्तव्य केले, जे राजकारणात खूप गाजले. राज ठाकरेंनी शिवसेना फोडली नाही, तर स्वतःचा वेगळा राजकीय पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) स्थापन करण्याचा निर्णय घेतला. मनसेमध्ये आक्रमक बाण्याचे शिवसैनिक तसेच मुस्लिम आणि बहुजन तरुणांचा मोठा भरणा होता.

राज ठाकरेंनी परप्रांतीय अतिक्रमणाचा मुद्दा प्रभावीपणे मांडला. २००८ मध्ये मनसेने परप्रांतीयांविरोधात आंदोलन सुरू केले, ज्यामुळे ‘खळखट्याक’ हा शब्द मराठी माणसाची ओळख बनला. या आंदोलनामुळे राज ठाकरेंना अटक झाली आणि मनसैनिक आणखी भडकले. यामुळे राज ठाकरेंना ‘नवा मराठी हृदय सम्राट’ अशी प्रतिमा मिळाली, कारण बाळासाहेबांच्या वाढत्या वयामुळे आणि उद्धव ठाकरेंच्या मवाळ नेतृत्वामुळे शिवसेनेतील ‘धगधगता अंगार’ मनसेत कायम होता.

लोकसभा, विधानसभा निवडणुका आणि युतीचे प्रयत्न

२००९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये राज ठाकरेंच्या उमेदवारांनी लाखांनी मते मिळवली, ज्यामुळे शिवसेना-भाजप युतीला मोठा फटका बसला. राज ठाकरेंनी तेव्हा “तुमने अपुन को इतना मारा लेकिन अपुनने तुमको एकच मारा पण सॉलिड मारा” असे म्हणत आपल्या विजयाचे विश्लेषण केले. या निकालानंतर मराठी मतांच्या फाटाफुटीची चर्चा झाली आणि बाळासाहेबांनी ‘सामना’तून “या चिमण्यांनो परत फिरा” असे आवाहन केले.

त्याच काळात शिवसेना आणि मनसेच्या युतीची चर्चा सुरू झाली. उद्धव ठाकरेंनी ‘सामना’मधील मुलाखतीत राज ठाकरेंसमोर युतीसाठी हात पुढे केला, पण राज ठाकरेंनी “युतीची चर्चा वृत्तपत्रातून होत नाही” असे सांगत तो प्रस्ताव फेटाळला.

२००९ च्या विधानसभा निवडणुकीत मनसेने तब्बल १३ आमदार निवडून आणले, ज्यात मुंबई, कल्याण, नाशिक, संभाजीनगर आणि पुण्यातील जागांचा समावेश होता. हा मनसेचा उत्कर्षबिंदू ठरला. २०१२ च्या मुंबई महापालिकेत मनसेचे २७ नगरसेवक निवडून आले आणि नाशिकमध्ये मनसेचा पहिला महापौर बसला. अबू आझमींच्या मराठीत शपथ घेण्याच्या मुद्द्यावरून मनसेच्या आमदारांनी सभागृहात गोंधळ घातला, ज्यामुळे मनसेने विरोधी पक्षांची जागा घेतली.

संबंधातील चढ-उतार आणि कटुता

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात कायम कटुताच राहिली असे नाही. जुलै २०१२ मध्ये उद्धव ठाकरेंना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर राज ठाकरे त्यांचा अलिबाग दौरा सोडून मुंबईला आले, हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांनी उद्धव ठाकरेंची विचारपूस केली आणि स्वतः कार चालवत त्यांना ‘मातोश्री’वर सोडले. त्यावेळीही दोघा भावांचे मनोमिलन होणार अशी चर्चा काही काळ रंगली होती.

१७ नोव्हेंबर २०१२ रोजी बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले आणि पुन्हा एकदा शिवसेनेच्या भावी नेतृत्वाची चर्चा सुरू झाली. २०१४ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेच्या वादळामुळे अनेक स्थानिक पक्ष खच्ची झाली आणि मनसेचे आमदार राज ठाकरेंची साथ सोडू लागले.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने शिवसेनेसोबतची २५ वर्षांची युती तोडली. त्याचवेळी राज ठाकरेंनी शिवसेनेकडे युतीसाठी प्रस्ताव ठेवला आणि उद्धव ठाकरेंनी सकारात्मक प्रतिसाद दिला, परंतु ऐनवेळी त्यांनी माघार घेतली. मनसे-शिवसेना युती फिस्कटली. राज ठाकरेंनी आपल्या बाजूने बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाईंना चर्चेसाठी पाठवले होते, परंतु शिवसेनेकडून प्रतिसाद मिळाला नाही.

व्यक्तिगत टीका आणि वाढत जाणारी दरी

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील दरी वाढतच गेली. राज ठाकरेंनी सातत्याने शिवसेनेवर जाहीरपणे टीका केली. त्यांच्या प्रत्येक भाषणात शिवसेनेच्या ध्येयधोरणांवर आसूड ओढले जात होते. २०१७ च्या महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकत्र असतानाही, पुन्हा त्यांच्यात दरी पडली आणि दोन्ही पक्षांनी महानगरपालिका निवडणुका वेगवेगळ्या लढायच्या ठरवले.

याच काळात पुन्हा सेना आणि मनसे युतीची चर्चा सुरू झाली, पण शेवटच्या क्षणाला उद्धव ठाकरेंनी फोन उचलणे बंद केल्याचा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला. याच दरम्यान राज आणि उद्धव यांच्या जाहीर सभांमधून मोठी वैयक्तिक आणि कटू टीका समोर आली. राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर बाळासाहेबांना अखेरच्या काळात ‘तेलकट वडे’ घरात खाऊ घातले जात असल्याचा आरोप केला, ज्याला उद्धव ठाकरेंनीही व्यक्तिगत टीका करत उत्तर दिले.

२०१९ च्या निवडणुकांच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेत महाविकास आघाडी स्थापन केली आणि थेट मुख्यमंत्री झाले. राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला उपस्थित होते.

अस्तित्वाचा प्रश्न आणि सद्यस्थिती

उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात पुन्हा एकदा शिवसेनेला मोठ्या बंडाळीने खिंडीत घातले. एकनाथ शिंदे यांनी फक्त बंड केले नाही, तर शिवसेनेची दोन शकले केली आणि शिवसेनेचे नाव व चिन्ह धनुष्यबाणही उद्धव ठाकरेंकडून हिरावून घेतले. शिवसेना फुटल्यानंतर, जनतेच्या मनात सहानुभूती असतानाही, मनसे नेत्यांनी फोडाफोडी करणाऱ्यांचा पक्ष फुटला अशी टीका केली.

२०२४ ची लोकसभा निवडणूक मनसेने लढवली नाही आणि विधानसभा निवडणुकीतही मनसेला भोपळाही फोडता आला नाही. खुद्द राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे यांनाही पराभव पत्करावा लागला. तिकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांची संख्या २० पर्यंत मर्यादित राहिली आहे.

सध्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्याने, मराठी माणसासाठी मतभेद दूर ठेवून दोघांनाही एकत्र यावे लागेल अशी जाणीव निर्माण झाली आहे. राज ठाकरे यांच्या मुलाखतीतील त्यांच्या “महाराष्ट्र खूप मोठा आहे. महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद अत्यंत शुल्लक आहेत. एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे असं वाटत नाहीये, परंतु विषय फक्त इच्छेचा आहे” या विधानाला उद्धव ठाकरेंनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

सध्या दोन्ही भावांच्या एकत्र येण्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. राजकारणात अनेकदा अशक्यप्राय गोष्टी देखील घडून जातात. एकीकडे मुंबईत मराठी माणसाचा दबदबा कमी होत चालला असताना, बाळासाहेबांचा वारसा सांगणारे राज आणि उद्धव आता मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येणार का, या प्रश्नाचे उत्तर सध्या महाराष्ट्र शोधत आहे. पुढील निर्णय दोन्ही भाऊ एकत्र बसून घेतील असे दोन्ही पक्षांचे नेते सांगतात, मात्र एक राजकीय शक्ती म्हणून, किंबहुना किरकोळ विरोधावरून एकमेकांपासून लांब गेलेले ठाकरे बंधू एकत्र येणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

  • शब्दांकन : प्रतिक गंगणे, पुणे
For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026