Sonam Killed Raja Raghuvanshi : सोनम सापडली.. राजा रघुवंशी हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा

Sonam Killed Raja Raghuvanshi : मेघालयातील शिलाँग इथं हनिमूनसाठी गेलेलं दाम्पत्य राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी यांच्या बेपत्ता होण्याचं गूढ अखेर उलगडलं आहे. शिलाँगमध्ये राजा रघुवंशी याची हत्या करण्यात आली होती. त्याचा मृतदेह डोंगरावर आढळला होता. तर त्याची पत्नी सोनम रघुवंशी बेपत्ता झाली होती. आता सोनमला पोलिसांनी उत्तर प्रदेशातील गाझीपूर इथून अटक केली आहे.

पत्रकार कुटुंबांना वैद्यकीय खर्चात ५०% सवलत: ऐतिहासिक निर्णय!

गाझीपूरचे अतिरिक्त एसपी ज्ञानेंद्र प्रसाद यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. दरम्यान या प्रकरणात मेघालयच्या डीजीपींनी असंही म्हटलंय की राजाची पत्नीच कथितपणे या हत्या प्रकरणात सहभागी होती.

सोनमने राजाला मारण्यासाठी गुन्हेगारांना कामावर ठेवलं होतं. या प्रकरणाच त्याची पत्नी सोनमसह चार जणांना अटक करण्यात आली आहे. सोनम व्यतिरिक्त इतर तीन आरोपीदेखील मध्य प्रदेशातील आहेत. मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड के. संगमा यांनी सोमवारी सकाळी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून महत्त्वाची माहिती शेअर केली. त्यांनी लिहिलं, ‘राजा रघुवंशी हत्याकांडात पोलिसांनी अवघ्या सात दिवसांत मोठं यश मिळवलं आहे.

या प्रकरणात मध्य प्रदेशातील तीन हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे. तर एका महिला आरोपीने आत्मसमर्पण केलं आहे.’ या प्रकरणी पोलिसांची शोध मोहीम सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं. या जलद कारवाईबद्दल संगमा यांनी मेघालय पोलिसांचं कौतुकही केलं.

सोनम ही इंदूरच्या गोविंद कॉलनीची रहिवासी आहे. गेल्या वर्षी 11 मे रोजी तिने राजा रघुवंशी याच्याशी लग्न केलं होतं. सोनमने बी. कॉमपर्यंत शिक्षण घेतलं आहे. लग्नानंतर हे जोडपं शिलाँगला फिरायला गेलं होतं. त्यानंतर अचानक हे दोघं बेपत्ता झाले. शोध घेतला असता राजाचा मृतदेह शिलाँगच्या टेकडीवर आढळला होता.

सोनम आणि राजा आधी गुवाहाटीतील कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गेले होते. त्यानंतर दोघंही तिथून शिलाँगला पोहोचले होते. त्यानंतर दोघंही तिथून अचानक गायब झाले होते. याप्रकरणी आता सोनमने आत्मसमर्पण केलं आहे. दरम्यान सोनमला कोणतीही दुखापत झालेली नसून ती पूर्णपणे ठीक आहे. सध्या पोलिसांनी तिला उत्तरप्रदेशातील गाझीपूर इथल्या वन स्टॉप सेंटरमध्ये ठेवलंय.